मराठी माध्यमाची सजग निवड करा : प्रा. डॉ. दीपक पवार यांचे आवाहन
शिरूर (उद्धव जाधव) | मराठी अभ्यास केंद्र, कृषिलोक विकास संशोधन संस्था व शिरूर नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सहयोगी शाळा व संस्थांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय मराठीप्रेमी पालक महासंमेलन – २०२६ चा समारोप रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. पालक, शिक्षक, भाषा अभ्यासक, साहित्यिक व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांच्या लक्षणीय उपस्थितीमुळे संमेलनाला विचारमंथनाचे व्यापक स्वरूप प्राप्त झाले.
संमेलनाचे उद्घाटन दत्तात्रय वारे गुरुजी यांच्या हस्ते झाले. मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष प्रा. डॉ. दीपक पवार यांनी संमेलनाची भूमिका मांडताना सांगितले की, मराठी शाळा आणि मराठी भाषा केंद्रस्थानी ठेवून मराठी अभ्यास केंद्राचे काम सुरू आहे. विविध कारणे पुढे करून मराठी शाळा बंद पाडण्याच्या प्रवृत्तीला आमचा ठाम विरोध आहे. ज्या पालकांचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले, तेच पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमात घालून मराठी भाषेची गळचेपी करत आहेत. शाळेत प्रवेश घेताना माध्यम निवडण्याची जबाबदारी पालकांवर असते. त्यामुळे पालकांनी सजगपणे आणि ठामपणे मराठी माध्यमाची निवड करावी, असे आवाहन त्यांनी केले.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कृषिलोक विकास संशोधन संस्थेचे अध्यक्ष श्री. रविंद्र धनक होते. कार्यक्रमाला मुख्याधिकारी प्रीतम पाटील तसेच विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
मराठीला रोजगाराची भाषा करावी लागेल दुसऱ्या सत्रात “मराठी शाळांसाठी आम्ही काय करणार?” या विषयावर साहित्यिक राजन खान, प्रा. प्रतिमा परदेशी, शिक्षिका सीमा शिंदे, इंडी जर्नलच्या प्राजक्ता जोशी व सेवा फाउंडेशनचे वैभव वानखेडे यांनी आपली मते मांडली. राजन खान म्हणाले, मराठी ही केवळ भावनेची नव्हे तर पोटाची भाषा व्हायला हवी. इंग्रजीतून शिक्षण घेतल्यासच नोकरी मिळते असा समज पालकांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे मराठीला रोजगाराची भाषा करण्यासाठी शासनस्तरावर अधिक प्रयत्न होणे आवश्यक आहे.
दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात “त्रिभाषा धोरणाची गरज आहे का?” या विषयावर किशोर दरक, आनंद काटीकर व प्रकाश निर्मळ यांनी मते मांडली. पहिलीपासून हिंदी सक्ती असू नये, असे मत बहुसंख्य अभ्यासकांनी व्यक्त केले. या सत्राचे अध्यक्षस्थान भाषा सल्लागार समितीचे सदस्य प्रकाश परब यांनी भूषविले.
“शिक्षणाचे माध्यम आणि पालकांची भूमिका” या विषयावर लेखिका-दिग्दर्शिका मुक्ता व विनोद लवेकर, कुल्फी मासिकाचे ऋषिकेश दाभोळकर आणि भाषाअभ्यासक गंगाधर तोडमल यांनी संवाद साधला. मुलांच्या बौद्धिक, भावनिक व सर्जनशील विकासासाठी मातृभाषेतून शिक्षण अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी विविध उदाहरणांद्वारे स्पष्ट केले.
“मराठी शाळा संस्थाचालकांपुढील आव्हाने आणि उपाय” या सत्रात मिलिंद कांबळे, सुषमा पाध्ये व ज्ञानेश्वर जाधव यांनी विचार मांडले. RTE अंतर्गत फी प्रतिपूर्ती वेळेवर मिळत नसल्यामुळे विनाअनुदानित शाळा चालवणे कठीण झाले असल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
समारोपाच्या कार्यक्रमाला ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ या चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे, निर्माती क्षिती जोग, अभिनेत्री चिन्मयी सुमित, नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे व नगरसेविका उपस्थित होत्या. या चित्रपटामुळे मराठी शाळांबद्दल समाजात सकारात्मक संदेश गेला असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.


