जांबूत दि. ०७ | (प्रफुल बोंबे)
आपल्या परिसरात बिबट- मानव संघर्ष मोठा असून आपण स्वतःची सुरक्षितता राखून काम करणे गरजेचे आहे. वनविभागासोबत संवेदनशिलतेने काम करून आपला सजग निर्णय आपला जीव वाचवू शकतो तर जुन्नर वनविभागाच्या इतिहासात भूतो न भविष्यती शुट आउट ऑपरेशन हे पिंपरखेड (ता.शिरूर) येथूनच घडले यामुळेच तब्बल ४७ बिबट आपण जेरबंद करू शकलो; हे यश प्रशासनासह ग्रामस्थांचे आहे, असे मत जुन्नर वनविभागाच्या सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांनी व्यक्त केले. पिंपरखेड (ता.शिरूर) येथे नुकत्याच संपन्न झालेला मानव –वन्यप्राणी संघर्ष कार्यशाळा कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रसंगी वनविभागात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाकडून सुवर्ण पदक प्राप्त झाल्याबद्दल स्मिता राजहंस यांचा ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
पिंपरखेड आणि जांबूत येथे नोव्हेंबर २०२५ मध्ये बिबट्याच्या हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा बळी गेल्यानंतर ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत जी आंदोलने उभी केली त्याचा आवाज थेट शासनापर्यंत पोहचल्याने या कारवाईच्या कामाला गती मिळाली आणि त्यातून वाईल्ड लाईफ ,शार्प शुटर टीम, पिंजरे आणि इतर साधने उपलब्ध झाल्याने आपण हे बिबट जेरबंद करू शकलो असलो तरी देखील या भागात बिबट्यांची संख्या मोठी आहे. मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांनी काळजी घ्यावी व बिबट मानव संघर्ष कमी करण्यासाठी एक पाऊल सहजीवनाकडे टाकणे गरजेचे आहे असे आवाहन स्मिता राजहंस यांनी यावेळी केले.
कार्यक्रम प्रसंगी सुभेदार रामजी बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमाने सुशिल सहारे, सौमित्र तिजारे व राकेश निमसरकार यांचे माध्यमातून बिबट उपाययोजनासंदर्भात विविध कलाकारांकडून प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे , वनरक्षक लहू केसकर , महेंद्र दाते यांचेसह बेस कॅम्प टीमचे कर्मचारी, शिरूर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माऊली ढोमे, तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप बोंबे , रामदास बराटे , जयवंत बोंबे, देवराम ढोमे, शिवाजी वरे, बाळासाहेब बोंबे, गणेश बोंबे, आबाजी पोखरकर ,सचिन बोंबे, नरेंद्र बोंबे , रवींद्र बोंबे, विलास बोंबे, शिक्षिका प्रियांका दाभाडे, प्रियांका येवले यांचेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


