शिरूर दि.०६ ( अरुणकुमार मोटे)
शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावात दिवसाढवळ्या घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.माजी पंचायत समिती सदस्य तथा वैद्यकीय व्यवसायिक डॉ. कल्पना सुभाष पोकळे यांच्या मालकीच्या ‘ओम श्री क्लिनीक’मध्ये अज्ञात चोरट्याने प्रवेश करून तब्बल २ लाख ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींच्याच क्लिनीकमध्ये दिवसाढवळ्या चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संताप व्यक्त होत आहे.
याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. २ मे २०२६ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५.३० या वेळेत कवठे येमाई येथील ‘ओम श्री क्लिनीक’मध्ये घडली.
फिर्यादीनुसार, क्लिनीकमधील टेबलखालील ड्रॉवरमध्ये एक पर्स ठेवण्यात आली होती. या पर्समध्ये वैयक्तिक वापरातील मौल्यवान सोन्याचे दागिने व रोख रक्कम ठेवलेली होती. क्लिनीकचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला आणि कोणालाही संशय न येऊ देता पर्समधील सर्व मौल्यवान ऐवज लंपास केला.
चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये ३ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (अंदाजे किंमत १८ हजार रुपये), एक तोळा वजनाची सोन्याची बांगडी (६० हजार रुपये), १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण (१ लाख २ हजार रुपये), १३ ग्रॅम वजनाचे काळ्या मण्यांमधील दोन वाट्यांचे मणीमंगळसूत्र (७८ हजार रुपये) तसेच शंभर रुपयांच्या २० नोटा, अशी २ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण २ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.
घटना उघडकीस आल्यानंतर कवठे येमाई परिसरात एकच चर्चा रंगली असून,माजी पंचायत समिती सदस्यांच्या क्लिनीकमध्येच चोरट्याने इतक्या शांतपणे हात साफ केल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. व्यापारी, डॉक्टर, व्यावसायिक आणि नागरिकांमध्येही यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
गुन्ह्याची नोंद पोलीस हवालदार वाडेकर यांनी केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार करत आहेत. प्रभारी अधिकारी संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संशयित हालचाली आणि स्थानिक माहितीच्या आधारे अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत. पोलीस लवकरच आरोपीला जेरबंद करतील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

