शिरूर दि. १८ (अरुणकुमार मोटे )
शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील अनधिकृत उत्खनन प्रकरण उघडकीस आणण्यात RTI तथा व्हिसल ब्लोअर कार्यकर्ते अशोक भोरडे यांची महत्त्वाची भूमिका ठरली असून, त्यांच्या पाठपुराव्यामुळे संबंधित कंपनीवर प्रशासनाने मोठी कारवाई करत 43 लाख 50 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कारेगाव (ता. शिरूर, जि. पुणे) येथील प्लॉट क्रमांक 15 वर कार्यरत असलेल्या ओहासंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीविरुद्ध अनधिकृत उत्खननाबाबत 30 जुलै 2025 रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. तसेच 15 ऑगस्ट 2025 रोजी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याबाबतही निवेदन देण्यात आले होते.
या तक्रारीच्या अनुषंगाने मंडळ अधिकारी शिरूर यांनी 11 ऑगस्ट 2025 रोजी पंचनामा केला. पंचनाम्यात तीन वाहने व पोकलँडसह पाच यंत्रे जप्त करण्यात आल्याचे नमूद आहे.
यानंतर संबंधित कंपनीकडून रुपये 43,50,000 इतका दंड वसूल करून तो शासनाच्या खजिन्यात जमा करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात पुढील सुनावणीची प्रक्रिया सुरू असून नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार कार्यालयाने दिली आहे.
या कारवाईमुळे अनधिकृत उत्खनन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून RTI कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाला कठोर पावले उचलावी लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

