शिरूर, ता. ७ ( अरुणकुमार मोटे )
आई ही मायेचा सागर मानली जाते; मात्र शिरूर तालुक्यातील भांबर्डे येथे घडलेल्या एका अमानुष घटनेने या नात्यालाच काळिमा फासला आहे. अवघ्या अकरा महिन्यांच्या निष्पाप बाळाचा खून स्वतःच्या आईनेच केल्याचे उघड झाल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. सतत रडत असल्याच्या कारणावरून व दुसरे लग्न करण्यासाठी मुलाचा अडथळा निर्माण होत असल्याने आईनेच आपल्या चिमुकल्याचा जीव घेतल्याची कबुली पोलिस तपासात समोर आली असून, या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे.
यश रवींद्र पवार असे मृत बालकाचे नाव आहे. या प्रकरणी वडील रवींद्र अशोक पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आई पूजा रवींद्र पवार हिला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी (ता. ६) अटक केली. याआधी ८ मार्च रोजी भांबर्डे (ता. शिरूर) येथील पवार वस्तीवरील शेतातील विहिरीत एका कपड्याच्या बॅगेत बालकाचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला ही घटना अकस्मात मृत्यू म्हणून नोंदवण्यात आली होती; मात्र तपासाची चक्रे फिरू लागल्यानंतर या प्रकरणातील भयानक सत्य हळूहळू समोर येऊ लागले.
संशयास्पद हालचालींनी पोलिसांचे लक्ष वेधले
घटनेनंतर पोलिसांनी पूजा पवार यांची चौकशी केली असता त्यांच्या जबाबात विसंगती आढळून आली. त्यांनी दिलेली उत्तरे उडवाउडवीची व संशयास्पद होती. यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला. दरम्यान, वडील रवींद्र पवार यांनी दिलेल्या जबाबातील काही महत्त्वाच्या बाबींची सांगड घालत पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. तांत्रिक माहिती, घटनास्थळावरील पुरावे आणि दोन्ही बाजूंचे जबाब तपासून पोलिसांनी आरोपी पूजाला पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेतले.
कसून चौकशीदरम्यान अखेर पूजा पवार हिने गुन्ह्याची कबुली दिली आणि या अमानुष कृत्याचा उलगडा झाला.
किरकोळ कारणावरून घेतला टोकाचा निर्णय
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार दांपत्य काही दिवसांपूर्वी मुरूड जंजिरा येथे फिरायला गेले होते. तेथून परतल्यानंतर यश हा सतत रडत असल्याची तक्रार पूजा करत होती. बालकाच्या रडण्यामुळे ती मानसिकदृष्ट्या त्रस्त झाली होती, अशी माहिती समोर आली आहे.
याच पार्श्वभूमीवर तिने एक टोकाचा आणि अमानुष निर्णय घेतला. पुढे आयुष्यात दुसरे लग्न करायचे असल्यास मुलगा अडथळा ठरेल, असा अविचार तिच्या मनात आला. या विकृत विचारातूनच तिने स्वतःच्या मुलाचाच जीव घेण्याचा निर्णय घेतला.
निर्घृण हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
घटनेच्या दिवशी आरोपी पूजाने आपल्या अकरा महिन्यांच्या बाळाला मारहाण केली. त्यानंतर घरासमोरील सिमेंटच्या ओट्यावर आपटून त्याचा जीव घेतला. एवढ्यावरच न थांबता, तिने गुन्हा लपवण्यासाठी घरातील रक्ताचे डाग पाण्याने स्वच्छ करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
यानंतर तिने मृतदेह कपड्यांच्या बॅगेत भरला. बॅग पाण्यात बुडून राहावी यासाठी त्यात दगड टाकले आणि ती शेतातील विहिरीत फेकून दिली. हा संपूर्ण प्रकार अत्यंत थंड डोक्याने आणि नियोजनपूर्वक केल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.
या घटनेची माहिती समोर आल्यानंतर भांबर्डे परिसरासह संपूर्ण शिरूर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. आईकडूनच अशा प्रकारे निर्दयी कृत्य घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेकांनी या प्रकरणात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी आरोपी पूजाविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला असून, तिला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, या प्रकरणातील इतर पैलूंचाही शोध घेतला जात आहे.
ही घटना केवळ एक गुन्हा नसून समाजातील वाढत्या मानसिक ताणतणावाचे आणि विकृत विचारसरणीचेही द्योतक आहे. कौटुंबिक समस्या, मानसिक अस्थिरता आणि चुकीचे निर्णय यामुळे किती भयंकर परिणाम होऊ शकतात, याचे हे अत्यंत भयावह उदाहरण आहे.
आईच्या कुशीत सुरक्षित असावे असे मानले जाणारे बाळच तिच्या हातून मृत्यूमुखी पडल्याची ही घटना समाजाला अंतर्मुख करणारी आहे. अशा घटना टाळण्यासाठी कुटुंब, समाज आणि प्रशासन यांनी अधिक जागरूक राहण्याची गरज असल्याचेही यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे.

