
शिरूर : प्रतिनिधी
शिरूर येथील दिग्दर्शक, लेखक व निर्माते रामदास राऊत यांनी २०२० साली तृप्ती फिल्म प्रोडक्शनची स्थापना करून ग्रामीण व शहरी भागातील नवोदित कलाकारांना मोठा मंच उपलब्ध करून दिला आहे. विशेष म्हणजे तमाशा कलावंत, नाट्य कलाकार, रील्स कलाकार तसेच इतर नवोदितांना कोणत्याही प्रकारची ऑडिशन प्रक्रिया न ठेवता आपल्या चित्रपटांमध्ये संधी देण्याचे काम त्यांनी केले आहे.
तृप्ती टीम प्रोडक्शनचे आजपर्यंत सुमारे २०० हून अधिक लघुचित्रपट प्रदर्शित झाले असून या माध्यमातून अनेक नवोदित कलाकारांना अभिनयाची संधी मिळाली आहे. ग्रामीण भागातील हसवणाऱ्या कलेला व्यासपीठ देण्याचे महत्त्वाचे काम राऊत करत असल्याने त्यांच्या कार्याची विशेष दखल घेतली जात आहे.
बालपणापासूनच कलेची आवड असल्याने राऊत यांनी अभिनय, लेखन, दिग्दर्शन व निर्मिती या सर्व क्षेत्रांत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पुढील काळात त्यांच्या काही नव्या चित्रपटांचे काम सुरू असून हैदराबाद कस्टडी या एका थिएटर फिल्मचे शूटिंग सध्या शिरूर परिसरात सुरू असून या चित्रपटामध्येही त्यांनी छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
राऊत यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना संगीतरत्न दत्ता महाडिक जीवनगौरव पुरस्कार तसेच अहमदनगर येथील नाभिक संघटनेकडून समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील रांगडे लेखक, कवी, दिग्दर्शक व निर्माते अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
ग्रामीण भागातील कलाकारांना संधी देण्याचा त्यांचा प्रयत्न पुढेही सुरू राहणार असून, ज्यांना अभिनय किंवा चित्रपट क्षेत्रात काम करण्याची आवड आहे त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन रामदास राऊत यांनी केले आहे.

