शिरूर, दि. १३ (अरुणकुमार मोटे)
शिरूर येथील श्री स्वामी विवेकानंद लॉ कॉलेजमध्ये परीक्षेदरम्यान गैरप्रकार व विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप विद्यार्थिनीने केल्यानंतर या प्रकरणाची तालुक्यात मोठी चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, महाविद्यालय व्यवस्थापनाने या आरोपांवर सविस्तर खुलासा करत संबंधित आरोप पूर्णपणे खोटे, निराधार व महाविद्यालयाची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने करण्यात आलेले असल्याचे स्पष्ट केले आहे.
महाविद्यालय व्यवस्थापनाच्या वतीने शिरूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ, पुणे ही एक नोंदणीकृत शैक्षणिक संस्था असून तिच्या अंतर्गत आश्रमशाळा व लॉ कॉलेज अशा संस्था कार्यरत आहेत. या संस्थांमध्ये नियमित शैक्षणिक कार्य सुरू असून शैक्षणिक शिस्त व नियमांचे काटेकोर पालन केले जाते.
व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनीने केलेले आरोप वस्तुस्थितीशी विसंगत आहेत. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांची तपासणी (Checking) ही संबंधित बाह्य परीक्षकांच्या (External Examiner) उपस्थितीतच करण्यात आली होती. तसेच महिला विद्यार्थिनींची तपासणी ही केवळ महिला कर्मचारी व महिला प्राध्यापकांमार्फतच करण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थिनींच्या सन्मानाला धक्का पोहोचेल असे कोणतेही कृत्य घडल्याचा प्रश्नच निर्माण होत नसल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.
तक्रारीमध्ये प्रा. वरुण पवार व सौ. पल्लवी वर्षे यांच्यावर करण्यात आलेले आरोपही पूर्णपणे खोटे असल्याचे महाविद्यालय प्रशासनाने म्हटले आहे. संबंधित विद्यार्थिनी वगळता इतर कोणत्याही विद्यार्थ्यांनी तपासणी प्रक्रियेबाबत किंवा प्राध्यापकांविरुद्ध कोणतीही तक्रार दिलेली नाही. उलट इतर विद्यार्थ्यांनी लेखी निवेदन देऊन अशा प्रकारची कोणतीही घटना घडली नसल्याचे स्पष्ट केल्याचेही व्यवस्थापनाने सांगितले.
परीक्षेच्या कालावधीबाबतही व्यवस्थापनाने स्पष्टीकरण देत सांगितले की, प्रथम सत्राच्या परीक्षा २० जानेवारी २०२६ ते ४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पार पडल्या होत्या. मात्र विद्यार्थिनीने केलेले आरोप ९ मार्च २०२६ रोजी, म्हणजेच निकाल जाहीर झाल्यानंतर करण्यात आले. त्यामुळे हे आरोप वैयक्तिक नाराजी किंवा दुर्भावनापूर्ण हेतूने करण्यात आले असावेत, असा संशय व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.
तसेच महाविद्यालयात धर्माच्या आधारावर कोणताही भेदभाव केला जात असल्याचा आरोपही व्यवस्थापनाने फेटाळून लावला आहे. संस्थेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना जात, धर्म किंवा समुदाय न पाहता समान वागणूक दिली जाते आणि शैक्षणिक वातावरण पूर्णपणे समतोल व नियमबद्ध ठेवले जाते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
निकालामध्ये फेरफार केल्याचा किंवा पैसे घेऊन निकाल लावल्याचा आरोप देखील व्यवस्थापनाने ठामपणे नाकारला आहे. परीक्षा प्रक्रिया व निकाल जाहीर करण्याची प्रणाली ही विद्यापीठाच्या नियमांनुसार व त्यांच्या नियंत्रणाखाली पार पाडली जाते. त्यामुळे महाविद्यालयाच्या स्तरावर अशा प्रकारचा कोणताही हस्तक्षेप शक्य नसल्याचे प्रशासनाने नमूद केले.
दरम्यान, संबंधित विद्यार्थिनीने केलेल्या दाव्यांबाबत व्यवस्थापनाने आणखी एक महत्त्वाची बाब स्पष्ट केली आहे. विद्यार्थिनीने स्वतः परीक्षेत नापास झाल्याचा उल्लेख केला असला तरी प्रत्यक्षात तिचा SGPA 6.17 असून ती परीक्षेत उत्तीर्ण झालेली आहे. त्यामुळे तिच्या निवेदनातील काही बाबी परस्परविरोधी असल्याचेही व्यवस्थापनाने नमूद केले आहे.
याशिवाय संस्थेच्या म्हणण्यानुसार काही महिलांनी परिसरात लोकांना एकत्र जमवून महाविद्यालय परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच पत्रकारांना अपूर्ण व चुकीची माहिती देऊन संस्थेविषयी गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोपही व्यवस्थापनाने केला आहे.
सदर घटनेच्या दिवशीचे CCTV फुटेज महाविद्यालयाकडे उपलब्ध असून तपासासाठी आवश्यक असल्यास ते पोलीस प्रशासनाला सादर करण्यास संस्थेने तयारी दर्शवली आहे. तसेच संस्थेच्या प्रतिमेला धक्का पोहोचविण्याच्या उद्देशाने खोटे आरोप करणाऱ्यांविरोधात महाविद्यालय व्यवस्थापनाच्या वतीनेही पोलीसांकडे तक्रार देण्यात आली आहे.
एकूणच, विद्यार्थिनीने केलेल्या गंभीर आरोपांनंतर आता महाविद्यालय व्यवस्थापनाने दिलेल्या खुलाशामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून या प्रकरणातील सत्य परिस्थिती पोलीस तपासानंतर स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

