अष्टविनायक रस्त्यावरील ‘मृत्यूचा सापळा’ कधी बुजणार?
कवठे येमाईतील उघड्या ड्रेनेजमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूच
शिरूर, दि. १२ (अरुणकुमार मोटे) —
कवठे येमाई (ता. शिरूर) येथील येमाई चौकाजवळील अष्टविनायक रस्त्यालगत रामदेव स्टील दुकानासमोर रस्त्याच्या कडेला असलेले ड्रेनेज गेल्या अनेक दिवसांपासून उघड्या अवस्थेत असून ते परिसरासाठी अक्षरशः ‘मृत्यूचा सापळा’ ठरत आहे. या उघड्या ड्रेनेजमध्ये दुचाकी व चारचाकी वाहने अडकण्याचे प्रकार वारंवार घडत असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदार यांना याचे कोणतेही गांभीर्य नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच दुचाकीस्वार यांना या उघड्या ड्रेनेजमुळे जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात तर हा धोका आणखी वाढतो. अंधारात ड्रेनेज दिसून न आल्याने वाहनचालक थेट त्यात कोसळण्याची शक्यता असते.
ग्रामस्थांनी वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे व ठेकेदाराकडे तक्रारी करूनही अद्याप त्या ठिकाणी झाकण बसवण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रशासनाच्या हलगर्जीपणाबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. “एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा सवाल उपस्थित होत आहे.
या पार्श्वभूमीवर कवठे येमाई येथील नागरिकांनी इशारा दिला आहे की, जर येत्या दोन दिवसांत या ड्रेनेजवर योग्य झाकण बसवण्यात आले नाही, तर आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहोत. कोणत्याही अप्रिय घटनेस प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदारांनी तातडीने लक्ष घालून या धोकादायक ड्रेनेजवर झाकण बसवावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा कवठे येमाईकरांचा उद्रेक होणे अटळ असल्याचे चित्र आहे.

