
: शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत शिरूर – मलठण रस्त्यावरील आमदाबाद फाट्याजवळ रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या भीषण अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून तीन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे तेथील नागरिक सांगत आहे
शिरूर पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात १६ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास आमदाबाद–मलठण महामार्गावर, माशेरेमळा येथील नितीन थोरात यांच्या घरासमोर घडला. फिर्यादी शिवम सत्यवान साळवे (रा. मलठण, ता. शिरूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कार चालक संदीप प्रभाकर पुंडे (रा. कान्हूर मेसाई, जि. पुणे) याच्याविरुद्ध मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर अपघातात धिरज राजू पवळे (वय २४), त्यांची पत्नी वैभव धिरज पवळे (वय २१) व आई गोपिका राजू पवळे (वय ४५) हे तिघे जखमी झाले. त्यांना डोके, हात, पाय, छाती व मणक्याला गंभीर दुखापती झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्यासोबत असलेला तीन वर्षांचा विराज धिरज पवळे याचा मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला. सर्व जखमी व मृत बालक हे कोयाळी (ता. खेड, जि. पुणे) येथील रहिवासी आहेत.
अपघातानंतर फिर्यादी साळवे यांनी तत्परता दाखवत जखमींना शिरूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र चिमुकल्याचे प्राण वाचवता आले नाहीत. प्राथमिक तपासात चारचा की चालकाने वेग व निष्काळजीपणा केल्यामुळे अपघात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार अरुण उबाळे हे करत आहेत. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाढत्या अपघातांबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप नागरीकांना आपला जीव गमवावा लागत आहे.

