शिरूर दि. १३ ( अरुणकुमार मोटे) : शिरूर पोलीस स्टेशन येथे विवाहित महिलेच्या छळप्रकरणी पतीसह सासरच्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
शिरूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सपना पंकज डोके (वय २५, रा. रामलिंग, तुकाईमळा, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा विवाह दि.२४ मे २०२५ रोजी झाला. लग्नानंतर त्या सासरी नांदत असताना पती पंकज नवनाथ डोके, सासरे नवनाथ हनुमंत डोके, सासू सविता नवनाथ डोके तसेच इतर नातेवाईकांनी वेळोवेळी मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपींकडून त्यांना वारंवार शिवीगाळ, दमदाटी, मारहाण करण्यात आली. तसेच उपाशी ठेवून मानसिक छळ करण्यात आला असल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकाराला कंटाळून अखेर त्यांनी कायदेशीर कारवाईचा मार्ग स्वीकारत पोलीसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार कोथळकर करीत आहेत.


