शिरूर दि. २९ ( अरुणकुमार मोटे)
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असून, त्याचा थेट परिणाम जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांवर झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
राज्यातील १२जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी यापूर्वी ५फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान आणि ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी निश्चित करण्यात आली होती. मात्र, सुधारित कार्यक्रमानुसार आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान तर ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार असल्याची अधिकृत घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.
निवडणूक प्रक्रियेतील आधीचे टप्पे पूर्ण
राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांचा कार्यक्रम १३जानेवारी २०२६ रोजी जाहीर केला होता. त्यानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे, छाननी, नामनिर्देशनपत्र मागे घेणे, निवडणूक चिन्हांचे वाटप तसेच अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे हे सर्व टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहेत.
आता केवळ मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे शिल्लक आहेत.
दुखवटा आणि सर्वोच्च न्यायालयाचा कालावधी लक्षात घेऊन निर्णय
या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ नंतर केवळ दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे. अशा परिस्थितीतच २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले.
राज्य शासनाने २८ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत राज्यभर दुखवटा जाहीर केल्याने, या कालावधीचा विचार करून निवडणूक कार्यक्रमात आवश्यक बदल करण्यात आले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, संबंधित जिल्हाधिकारी ३१जानेवारी २०२६ रोजी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत सूचना प्रसिद्ध करतील.
मतदान व मतमोजणीचा सुधारित कार्यक्रम
🔹 मतदान :
➡️ ७ फेब्रुवारी २०२६
➡️ वेळ : सकाळी ७.३० ते सायंकाळी ५:३०
🔹 जाहीर प्रचाराची समाप्ती :
➡️ ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० वाजता
🔹 मतमोजणी :
➡️ ९फेब्रुवारी २०२६
➡️ वेळ : सकाळी १०वाजता
🔹 आचारसंहिता :
➡️ निकाल जाहीर होताच संबंधित ठिकाणी आचारसंहिता संपुष्टात येणार
🔹 राजपत्र प्रसिद्धी :
➡️ निवडून आलेल्या सदस्यांची नावे ११फेब्रुवारी २०२६ पर्यंत शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहेत.
राजकीय हालचालींना वेग….
निवडणूक कार्यक्रमात झालेल्या या बदलामुळे राज्यातील राजकीय पक्षांच्या रणनीतींमध्ये बदल होण्याची शक्यता असून, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यातील गणिते पुन्हा मांडली जात आहेत. दुखवट्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण काहीसे शांत असले तरी, मतदानाच्या नव्या तारखांमुळे ग्रामीण राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग येण्याची चिन्हे आहेत.

