सविंदणे–कवठे येमाई रस्ता मृत्यूच्या वाटेवर; निधी नसतानाही काम सुरू करून नागरिकांच्या जीवाशी खेळ
शिरूर दि. २७ (अरुणकुमार मोटे)
सविंदणे ते कवठे येमाई हा सुमारे ५ किलोमीटरचा महत्त्वाचा ग्रामीण रस्ता गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत टाकून दिल्याने परिसरातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व वाहनचालक अक्षरशः हैराण झाले आहेत. खडीकरण करून रस्ता तसाच सोडण्यात आल्याने आज हा रस्ता विकासाचा नव्हे तर अपघातांचा मार्ग ठरत आहे.या रस्त्यावरून दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर व शालेय वाहने प्रवास करतात. मात्र खडी उखडलेली, ठिकठिकाणी खोलगट खड्डे, उडणारी दगडधोंडे यामुळे वाहन चालवणे म्हणजे जीव मुठीत धरून प्रवास करण्यासारखे झाले आहे.
या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्रीपाद बलशेटवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी चक्क “निधी मिळालेला नाही, त्यामुळे काम अपूर्ण आहे” असे उत्तर दिले. मात्र यामुळेच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
निधीच नव्हता, तर काम सुरूच का केले?
कोणाच्या आदेशाने खडीकरण झाले?
कंत्राटदाराला कोणी पाठीशी घातले?
हे प्रश्न आता उघडपणे विचारले जात आहेत.
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, निधी मंजूर नसताना घाईघाईने काम सुरू करून केवळ कागदोपत्री प्रगती दाखवण्याचा हा प्रकार असून यामागे अधिकारी-कंत्राटदार संगनमताचा संशय व्यक्त केला जात आहे. अर्धवट कामामुळे अपघात घडल्यास जबाबदारी कोण घेणार, असा सवालही उपस्थित होत आहे.
या रस्त्यावरून शाळकरी मुले, रुग्णवाहिका, गर्भवती महिला, शेतमाल वाहतूक होते. अशा स्थितीत रस्ता अर्धवट ठेवणे म्हणजे थेट नागरिकांच्या जीवाशी खेळ असल्याची तीव्र प्रतिक्रिया गावकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
दरम्यान, सविंदणे गावातील स्पीड बेकर ही धोकादायक रीत्या तयार केले आहेत. त्यामुळे अने क अपघात झाले आहे. त्यामुळे आता नागरीकांचा संयमाचा बांध तुटत असून, रस्ता तात्काळ पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
“फक्त निवडणुकीच्या तोंडावर रस्ते आठवतात, बाकी वेळेला ग्रामीण जनतेकडे कुणाचेच लक्ष नसते,” अशी संतप्त भावना ग्रामस्थ बोलून दाखवत आहेत.
सविंदणे–कवठे येमाई रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करावे, अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन, रास्ता रोको व अधिकाऱ्यांना घेराव केला जाईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.
आता प्रश्न एवढाच आहे की,प्रशासन जागे होणार का? की एखाद्या मोठ्या अपघातानंतरच हालचाल होणार?

