रिक्षाचालक ते नगरसेवक व आता सार्वजनिक बांधकाम समिती सभापती,सुनिल जाधव यांचा संघर्षातून नेतृत्वापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास…
शिरूर, दि. २४ ( अरुणकुमार मोटे)
शिरूर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३ मधून सामान्य रिक्षाचालक ते नगरसेवक आणि पुढे सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापती असा थक्क करणारा प्रवास करत सुनिल शंकरराव जाधव यांनी शिरूरच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात आपली ठळक छाप उमटवली आहे. कष्ट, प्रामाणिकपणा आणि लोकांशी थेट संवाद या बळावर त्यांनी उभा केलेला हा प्रवास आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
सामान्य कुटुंबात जन्मलेले सुनिल जाधव हे श्रमिक वर्गातील प्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. रिक्षाचालक म्हणून शहरभर फिरताना त्यांचा थेट संपर्क सर्वसामान्य नागरिकांशी आला. याच अनुभवातून शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, गटारी, स्ट्रीट लाईट यांसारख्या मूलभूत प्रश्नांची जाणीव त्यांना झाली. केवळ समस्या पाहून थांबण्यापेक्षा त्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यायचा, हीच त्यांची भूमिका राहिली. यामुळेच अल्पावधीतच त्यांचे नाव प्रभाग ३ मधील नागरिकांच्या मनात घर करू लागले.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी प्रचारात आघाडी घेतली. “आपल्यातीलच एक” अशी ओळख निर्माण करत त्यांनी घराघरात जाऊन संवाद साधला. कोणतेही मोठे आश्वासन न देता, प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि भविष्यासाठीची स्पष्ट दिशा त्यांनी मतदारांसमोर मांडली. याचा परिणाम म्हणून तरुणाई, महिला, कामगार, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व स्तरांतून त्यांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
सुनिल जाधव हे शिरूर–हवेलीचे लोकप्रिय आमदार माऊली आबा कटके यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. कटके यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना त्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. लाभार्थ्यांना योजनांची माहिती देणे, अर्ज प्रक्रिया सुलभ करणे आणि अडचणी सोडवणे या माध्यमातून त्यांनी लोकांचा विश्वास अधिक दृढ केला.
सामाजिक कार्याची ठाम ओळख असलेले जाधव यांनी गेल्या काही वर्षांत रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, महिला सक्षमीकरण कार्यक्रम, विद्यार्थी मार्गदर्शन शिबिरे यांसारख्या उपक्रमांचे सातत्याने आयोजन केले. विशेषतः कोरोना काळात त्यांनी मोफत धान्य, अन्नधान्य किट, औषधे आणि वैद्यकीय मदत पुरवून खऱ्या अर्थाने जनसेवेचा आदर्श ठेवला. संकटाच्या काळात धावून येणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची प्रतिमा अधिक ठळक झाली. स्वप्नील अण्णा रेड्डी,
डॉ. मोहसीन पठाण,आसिफ अजमोद्दीन खान
अशोक भाऊ कुलथे,हरिभाऊ वीर,चेतन परदेशी
महेंद्र भाऊ येवले,किरण काळे मेजर,सचिन लोळगे,नानू भव्हाळ,ओंकार माळवदे,योगेश कदम
स्वप्नील चौधरी,आशिष उबाळे,सिद्धांत चव्हाण,महाबली मिसाळ
आकाश चव्हाण,यश धनी,सौरभ पानसरे या तरुणांची मोठी फळी उभी करत त्यांनी या युवकांना सामाजिक प्रश्नांमध्ये सक्रिय सहभागासाठी प्रेरित केले. नेतृत्व, संघटन आणि जबाबदारीची भावना रुजवण्याचा त्यांचा प्रयत्न आज स्पष्टपणे दिसून येतो. याच संघटित ताकदीच्या बळावर त्यांनी निवडणुकीत यश संपादन केले.
नगरसेवक म्हणून निवड झाल्यानंतर सुनिल शंकरराव जाधव यांची शिरूर नगरपरिषदेच्या सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी निवड होणे, ही त्यांच्या कार्याची पावती मानली जात आहे. शहरातील विकासकामांना गती देणे, दर्जेदार रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा आणि सार्वजनिक सुविधा मजबूत करणे, हा त्यांचा प्राधान्यक्रम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
“मी स्वतः सामान्य घरातील असल्याने लोकांच्या अडचणी मला मनापासून कळतात. प्रभाग ३ चा सर्वांगीण विकास आणि प्रत्येक नागरिक हा माझा परिवार आहे,” अशी भावना व्यक्त करत जाधव यांनी जनतेचे आभार मानले.
रिक्षाचालक ते सार्वजनिक बांधकाम समिती सभापती असा हा प्रवास केवळ वैयक्तिक यशाचा नाही, तर सामान्य माणूसही नेतृत्व करू शकतो, हे दाखवणारा आहे. शिरूर शहराच्या विकासात सुनिल शंकरराव जाधव यांची भूमिका महत्त्वाची ठरेल, यात शंका नाही.
खुप खुप हार्दिक अभिनंदन सुनिल..!( अरुणकुमार मोटे – संपादक, शिरूर डिजिटल. कॉम)

