विद्यार्थ्यांना न्यायव्यवस्थेची ओळख; सजग नागरिकत्वाचा संदेश
शिरूर, दि. १८ (अरुणकुमार मोटे)
आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासोबतच कायदेविषयक जागरूकता आवश्यक असल्याच्या उद्देशाने विद्याधाम प्रशाला, शिरूर येथे कायदेविषयक जनजागृती व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला घोडनदी न्यायालयाचे माननीय न्यायाधीश डी. बी. डोमाळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या शिबिरात विद्यार्थ्यांना कायदा, न्यायव्यवस्था व सामाजिक जबाबदाऱ्या यांची सविस्तर माहिती देण्यात आली. घोडनदी वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. उदय सरोदे यांनी कायदेविषयक जनजागृतीचे महत्त्व स्पष्ट करताना, विद्यार्थीदशेतच योग्य-अयोग्याची जाणीव निर्माण झाल्यास समाज अधिक सक्षम होतो, असे प्रतिपादन केले.
ॲड. वीरेंद्र सावंत यांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्याबाबत मार्गदर्शन करत बालविवाहाचे सामाजिक, मानसिक व कायदेशीर दुष्परिणाम विद्यार्थ्यांसमोर मांडले. ॲड. साहेबराव जाधव यांनी रॅगिंगचे दुष्परिणाम व त्यावरील कायदेशीर तरतुदी स्पष्ट करून अशा प्रवृत्तींपासून दूर राहण्याचे आवाहन केले.
ॲड. सारिका बर्डे यांनी व्यसनाधीनतेमुळे होणारे आरोग्यविषयक, कौटुंबिक व कायदेशीर नुकसान सांगत विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचा संदेश दिला. ॲड. वैशाली धोंगडे यांनी विद्यार्थ्यांचे हक्क, कर्तव्ये व कायदेशीर जबाबदाऱ्या याविषयी माहिती देत सजग नागरिक होण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी ॲड. विशाल शेंडगे, ॲड. विवेक खांडरे, ॲड. कविता कर्डिले, नीता निंबाळकर, ऋषिकेश बोराडे व लिपिक बोंदर्डे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शंकांचे निरसन केले.
अध्यक्षीय भाषणात माननीय न्यायाधीश डी. बी. डोमाळे यांनी कायदा म्हणजे केवळ शिक्षा देणारी व्यवस्था नसून समाजाला योग्य मार्गावर नेणारे प्रभावी साधन आहे, असे नमूद केले. विद्यार्थ्यांनी कायद्याची माहिती आत्मसात करून स्वतःसह समाजालाही योग्य दिशा द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक पाचारणे सर व देविकर सर यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी कायद्याची माहिती प्रत्यक्ष आचरणात आणून आदर्श नागरिक बनावे, असे सांगितले.
या शिबिरास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये उत्साह व जिज्ञासा दिसून आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जागरूकता वाढण्यास मोठी मदत झाली असून भविष्यात असे उपक्रम अधिक प्रमाणात राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.


