शिरूर, दि. १६ (उद्धव जाधव) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेला अष्टविनायक महामार्ग हा महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतींना एकाच साखळीत जोडणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. धार्मिक पर्यटनाला चालना देत व्यापारी केंद्रे विकसित करून अर्थव्यवस्था बळकट करण्याचा यामागील उद्देश होता. मात्र प्रत्यक्षात हा महामार्ग सध्या ‘विकासाचा मार्ग’ न राहता अपघातांचा महामार्ग ठरत असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे.
अष्टविनायक महामार्गावरील रस्त्यांची दयनीय अवस्था, जागोजागी पडलेले खड्डे, उखडलेले डांबरीकरण, तसेच बेकायदेशीर व शास्त्रशुद्ध नसलेले गतिरोधक यामुळे वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. विशेषतः रांजणगाव ते सिद्धटेक या मार्गावरील करडे ते आंबळे दरम्यानच्या देशमुख वस्ती परिसरात सुमारे एक किलोमीटरच्या पट्ट्यात रस्ता पूर्णतः उखडलेला आहे. या ठिकाणी लहान-मोठ्या बेचक्या व खोल खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचे पुढील चाक अडकून रस्त्याच्या मध्यभागी अपघात होत आहेत.
या महामार्गावरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने अशा अपघातांत दुचाकीस्वाराचा जीव जाण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. केवळ डागडुजी करून डांबर टाकण्याऐवजी संपूर्ण रस्ता खोदून नव्याने मजबुतीने तयार करावा, अशी ठाम मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. मात्र वारंवार तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
याच अष्टविनायक महामार्गावरील शिरूर – मलठण रस्त्यावरील शिंदेवाडी येथील वळणावर मोठमोठे खड्डे पडले असून या ठिकाणी अनेक अपघात घडले आहेत. तसेच सविंदणे परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे तेथे शास्त्रशुद्ध पद्धतीने गतिरोधक बसवण्याची नितांत गरज आहे. कवठे यमाई येथील चौकाजवळ गटारावरील झाकण तुटून पडल्याने नागरिक व वाहनचालकांसाठी मोठा धोका निर्माण होऊन अपघात घडत आहे.
या सर्व गंभीर बाबी प्रशासनाच्या निदर्शनास आणूनही अद्याप कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याने अष्टविनायक महामार्ग खरोखरच ‘मृत्यूचा सापळा’ बनला आहे का? असा सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत. तातडीने रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास स्थानिक ग्रामस्थ आंदोलन छेडण्याच्या पावित्र्यात असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.


