शिरूर दि. ११ ( अरुणकुमार मोटे)
शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बाबुरावनगर परिसरातील पायाभूत सुविधांची अक्षरशः वाताहत झाली असून रस्त्यांची अपूर्ण कामे, तुंबलेल्या गटार लाईन्स आणि विस्कळीत पाणीपुरवठा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या समस्यांकडे ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
गंगा पेट्रोल पंपामागील टॉवर लाईन रस्त्याचे काम तीन महिन्यांपूर्वी मुरुमीकरण करून अर्धवट अवस्थेत सोडण्यात आले आहे. परिणामी या रस्त्यावरून खडी क्रेशरचे अवजड डंपर सातत्याने ये-जा करत असून संपूर्ण परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून लहान मुले, वृद्ध आणि श्वसनाचे आजार असणाऱ्या रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
याशिवाय शिवसाई मंगल कार्यालयाशेजारील गटार लाईन गेल्या आठ दिवसांपासून तुंबलेली असून परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. सततच्या दुर्गंधीमुळे परिसरात राहणेही कठीण झाले असून डास, माश्या आणि संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून या भागात वारंवार गटार लाईन तुंबण्याचे प्रकार घडत असून तात्पुरती डागडुजी करून समस्या झाकली जात असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाकडून वेळोवेळी काम केले जात असले तरी कायमस्वरूपी तोडगा न निघाल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून स्थानिक रहिवासी संतप्त झाले आहेत.
“या ड्रेनेज लाईनचा तांत्रिक अभ्यास करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, तसेच अपूर्ण रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करावे,” अशी ठाम मागणी बाबुरावनगरमधील नागरिकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही सुजाण नागरिकांनी दिला आहे.


