रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्था यांचा वतीने आदर्श माता व आदर्श पत्रकार पुरस्काराने मान्यवरांचा गौरव
शिरूर दि. १३ ( अरुणकुमार मोटे )
“राजमाता जिजाऊ या केवळ शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या, तर स्वराज्याच्या पहिल्या गुरू होत्या. त्यांनी शिवरायांच्या मनात स्वधर्म, स्वराज्य आणि स्वाभिमानाची बीजे रोवली. तसेच स्वामी विवेकानंद यांनीही आदर्श जीवनमूल्यांची शिकवण समाजाला दिली. या दोघांचे ही कार्य महान असून विद्यार्थ्यांनी त्यांचे विचार प्रत्यक्ष आचरणात आणावे” असे आवाहन रामलिंग उन्नती बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणीताई कर्डीले यांनी केले.
रांजणगांव येथील मंगलमूर्ती विद्याधाम शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी रामलिंग उन्नती बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या वतीने कौसल्या कांतीलाल शिंदे व उज्ज्वला सुदाम कुटे यांना आदर्श माता तर ज्येष्ठ पत्रकार सतीश डोंगरे यांना आदर्श पत्रकार पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंगलमूर्ती विद्याधामचे मुख्याध्यापक सुनिल थोरात होते. रांजणगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य संदीप कुटे, सौ. अश्विनी नरवडे व सुवर्णा चिपाडे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना सौ. कर्डीले पुढे म्हणाल्या, राजमाता जिजाऊ या एक स्त्री असूनही त्यांनी कठीण काळात धैर्य, शहाणपण आणि नेतृत्व दाखवले.अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा त्यांनी शिवरायांना दिली. त्यांच्या संस्कारांमुळेच शिवाजी महाराज एक आदर्श, लोककल्याणकारी राजा घडले. राजमाता जिजाऊ या मातृत्व, राष्ट्रभक्ती आणि संस्कारांचे तेजस्वी प्रतीक आहेत.
आजच्या पिढीने त्यांच्या विचारांतून प्रेरणा घ्यावी. स्वामी विवेकानंद यांनीही स्वतःवर विश्वास ठेवून समाजासाठी काम करण्याची शिकवण त्यांनी दिली.
यावेळी संदीप कुटे, पत्रकार तेजस फडके यांचीही भाषणे झाली. सूत्रसंचालन माहेश्वरी माने व स्मिता सुतार यांनी तर प्रशालेचे पर्यवेक्षक सुभाष पाचकर यांनी आभार मानले.

