शिरूर दि. १२ | ( अरुणकुमार मोटे)
शिरूर–मलठण रस्ता : सार्वजनिक बांधकाम विभागाचा बेजबाबदार कारभार उघड
शिरूर–मलठण हा अत्यंत महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग आज सार्वजनिक बांधकाम विभाग शिरूरच्या अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी नव्हे तर लाजिरवाणा अपयशाचा नमुना ठरला आहे. निकृष्ट दर्जाचे काम, वेळोवेळी पडणारे प्रचंड खड्डे, आणि केवळ वरवरची मलमपट्टी त्यामुळे या रस्त्याने प्रशासनाची पोलखोल केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे तब्बल तीन वेळा नवीन काम करण्यात आले. तरीही काही महिन्यांतच रस्त्यावर पुन्हा मोठमोठे खड्डे पडले. प्रशासनाला ते खड्डे तीन वेळा बुजवावे लागले — पण रस्त्याची अवस्था मात्र जैसे थेच राहिली आहे प्रश्न एकच पडतो मग अधिकारी नक्की करतात तरी काय?
काम चुकीचे करणारा ठेकेदार मोकाट, देखरेख करणारे अधिकारी मोकाट आणि नुकसान मात्र नागरिकांचं! विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अनिल जाधव यांनी नुकतेच कर्डे न्हावरे या रस्त्याचे चुकीचे काम केल्यामुळे त्यांना याप्रकरणी माननीय उच्च न्यायालयात माफी मागावी लागली आहे. असे असूनही अद्याप त्यांच्यावर कोणतीही प्रशासकीय कारवाई नाही.
ना निलंबन, ना चौकशी, ना दंड हा कोणता न्याय?
दररोज हजारो नागरिक या रस्त्यावरून जीव धोक्यात घालून प्रवास करतात. वाहनांचे नुकसान, अपघात, वाहतूक कोंडी आणि वेळेचा अपव्यय हा नागरिकांचा वाटा, तर निधीचा अपहार आणि जबाबदारीपासून पळ काढणे हा प्रशासनाचा उद्योग!ही केवळ रस्त्याची नाही, तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या व्यवस्थेची कुजलेपणाची कहाणी आहे
तीन वेळा रस्ता, तीन वेळा खड्डे, आणि तरीही कारवाई शून्य म्हणजेच दोषींना मोकळं रान आणि जनतेला अडचणींचा डोंगर,आता नागरिकांचा सवाल थेट आहे अनिल जाधव यांच्यावर कधी कारवाई होणार? ठेकेदाराला काळ्या यादीत टाकणार कधी?
आणखी किती अपघात झाल्यावर प्रशासन जागं होणार?
जर अजूनही कारवाई झाली नाही, तर हा रस्ता नव्हे तर भ्रष्टाचाराचा महामार्ग असल्याचं शिक्कामोर्तब होईल, आणि जनतेचा रोष रस्त्यावर उतरण्यास वेळ लागणार नाही..


