शिरूर, दि. ११ (अरुणकुमार मोटे)
शिरूर तालुक्यात चर्चेत असलेल्या कथित ‘सुलभ’ भिशी घोटाळ्याने दिवसेंदिवस अधिक गंभीर रूप धारण केले असून या प्रकरणातील काही नवीन बाबी आता समोर येऊ लागल्या आहेत. नागरिकांसह काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याची चर्चा असताना, या संपूर्ण प्रकरणात पोलिसांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात सापडत असल्याचे चित्र दिसत आहे.
या घोटाळ्यात सुमारे ३० पेक्षा अधिक नागरिकांनी कारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिले असतानाही अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण आहे. दरम्यान, काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया देत “पोलिसांना अनधिकृत भिशी चालवण्यास परवानगी नसताना पोलिसच अशा योजनांना पाठबळ देत असतील आणि स्वतःही फसत असतील, तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा?” असा गंभीर सवाल उपस्थित केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘सुलभ भिशी’ या नावाखाली काही वर्षांपासून बचत योजना सुरू करण्यात आली होती. सुरुवातीच्या टप्प्यात लहान रकमेच्या भिशी चालवून वेळेवर परतावा देण्यात आल्याने अनेक नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात यश आले. या विश्वासाच्या आधारे हळूहळू मोठ्या रकमेच्या भिशी सुरू करण्यात आल्या आणि व्यवहारांची रक्कम लाखोंवरून कोट्यवधींपर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या भिशीत शिरूर तालुक्यातील अनेक गावांतील नागरिकांनी पैसे गुंतवले होते. काही गुंतवणूकदारांनी रोख स्वरूपात तर काहींनी बँक व्यवहाराद्वारे पैसे दिल्याचेही सांगितले जात आहे. या व्यवहारांचा एकूण आकडा सुमारे ३० कोटी रुपयांच्या आसपास असू शकतो, अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे.
या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे संबंधित महिलेची काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी असलेली जवळीक. कारेगाव पोलीस ठाण्यात तिची वारंवार ये-जा असल्याने अनेक गुंतवणूकदारांच्या मनात तिच्याबाबत विश्वास निर्माण झाला होता. याच विश्वासाच्या आधारे काही पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनीही या भिशीत पैसे गुंतवल्याची चर्चा आहे.
सूत्रांच्या मते, कारेगाव व कारेगाव येथून बदली होऊन शिरूर आणि शिक्रापूर पोलीस ठाण्यांत गेलेले काही कर्मचारी या भिशीत थेट किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी असल्याची चर्चा रंगत आहे. काहींनी स्वतःच्या बचतीतून, काहींनी कर्ज काढून तर काहींनी मोठ्या रकमा गुंतवल्याचे सांगितले जात आहे. एका महिला अधिकाऱ्यांनी तब्बल ५० लाख रुपये गुंतवल्याची चर्चाही तालुक्यात सुरू आहे.
यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे. कारण पोलिसांनी स्वतःच अशा अनधिकृत आर्थिक व्यवहारांपासून दूर राहणे अपेक्षित असताना, काही कर्मचारीच या योजनांमध्ये सहभागी असल्याचे बोलले जात असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते, पोलिसांनी कायद्याचे पालन करून नागरिकांचे संरक्षण करणे अपेक्षित असते. मात्र जर पोलिसच अशा योजनांमध्ये सहभागी होत असतील किंवा अशा योजनांना अप्रत्यक्ष पाठबळ देत असतील, तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा हा मोठा प्रश्न निर्माण होतो.
या पार्श्वभूमीवर या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून तपास स्थानिक पोलीस ठाण्याऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडे द्यावा, अशी मागणी नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.
दरम्यान, या प्रकरणाबाबत पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांनी सांगितले की, भिशीच्या नावाखाली आर्थिक फसवणूक झाल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून प्राथमिक चौकशी सुरू आहे. चौकशीअंती आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
मात्र चौकशीचा कालावधी वाढत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. या प्रकरणात नेमके किती पैसे गुंतले, किती गुंतवणूकदार आहेत आणि या भिशीचे जाळे किती मोठे आहे, याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
तथापि, दिवसेंदिवस समोर येणाऱ्या नव्या माहितीमुळे या कथित घोटाळ्याची व्याप्ती वाढत असल्याचे दिसत असून पुढील काळात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
क्रमशः…

