शिरूर, दि. ५ : गर्भधारणेपूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ (पीसीपीएनडीटी) कायद्याअंतर्गत शिरुर तालुक्यातील ढोकसांगवी परिसरातील पाचंगेवस्ती येथील लाइफ केअर रुग्णालयामध्ये गर्भलिंग निदान चाचणी होत असल्याच्या पार्श्वभुमीवर आरोग्य विभाग व गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने धडक कारवाई केली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत बी.ए.एम.एस शिक्षण घेतलेले डॉ. आकाश मालगुंडे यांच्या रुग्णालयामध्ये पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. वाघोली पोलीस स्टेशनच्या पोलीस शिपाई प्रतीक्षा पानसरे यांनी रुग्णासोबत जाऊन प्रत्यक्ष सापळा रचला. दलाल नरेंद्र ठाकरे, (रा. केसनंद, ता. हवेली, जि. पुणे ) याच्या मार्फत मोबाईल ॲपच्या सहाय्याने विविध रुग्णांची गर्भलिंग निदान तपासणी केल्याचे संयुक्त तपासात उघड झाले.
तपासणीदरम्यान रुग्णालयात गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्यांचा साठा आढळून आला असून संबंधित साहित्य जप्त करण्यात आले आहे. पीसीपीएनडीटी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. आरोग्य सेवा, पुणे मंडळाचे उपसंचालक डॉ.भगवान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गुन्हे शाखेच्या पथक क्रमांक ७ चे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई यांच्या कारवाई करण्यात आली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, ग्रामीण रुग्णालय शिरूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन धस यांच्या उपस्थितीत संयुक्त तपासणी करण्यात आली. गर्भलिंग निदान करणे व करवून घेणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा असून अशा प्रकारांची माहिती तात्काळ आरोग्य विभाग किंवा पोलीस प्रशासनाला द्यावी, संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आवाहन डॉ. यमपल्ले यांनी केले आहे.


