टाकळी हाजी : (साहेबराव लोखंडे)
सभासदांच्या हितासाठी विविध कल्याणकारी योजना राबविणाऱ्या बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेने अपघाती विमा योजनेतून पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपली आहे. संस्थेच्या सभासद स्वर्गीय वंदना कैलास घोडे (रा. टाकळी हाजी, ता. शिरूर) यांचा पाबळ येथे मोटारसायकल अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता.
पतसंस्थेने सर्व सभासदांचा प्रत्येकी एक लाख रुपयांपर्यंतचा अपघाती विमा उतरविला असून, त्याअंतर्गत स्वर्गीय घोडे यांच्या वारसांना विमा दावा मंजूर करून देण्यात यश आले. या माध्यमातून स्वर्गीय वंदना घोडे यांचे वारसदार दत्तात्रय कैलास घोडे यांना १ लाख रुपयांचा धनादेश संस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी उपाध्यक्ष नामदेव थोरात, संचालक चंद्रकांत लामखडे, बाळासाहेब लामखडे, दामूशेठ लंके, भिवाशेठ रसाळ, शांताराम कळसकर, अभिजीत मासळकर, बाबाजी कळसकर, सतीष साळवे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय लंके, उपव्यवस्थापक शांताराम सुरकुंडे, जनरल मॅनेजर संपत ठुबे आणि शाखाधिकारी चंद्रकांत लंके आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थेच्या या उपक्रमामुळे सभासदांमध्ये समाधान व्यक्त होत असून, कठीण प्रसंगी पतसंस्था खंबीरपणे पाठीशी उभी राहत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून भविष्यातही अशा योजना प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.


