शिरूर, दि. ०१ ( अरुणकुमार मोटे)
ग्रामीण भागातील नागरिकांचे महसूल, जमीन, दाखले व विविध शासकीय योजनांशी संबंधित प्रश्न थेट गावपातळीवर सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाच्या वतीने “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” टप्पा क्र. १ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दि. ०१ मार्च रोजी विदयाधाम प्रशाला, शिरूर येथे पूर्वतयारी बैठक पार पडली.
बैठकीचे अध्यक्षस्थान उपविभागीय अधिकारी विठ्ठल जोशी यांनी भूषविले. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्यासाठी हा उपक्रम राज्य शासनाचा महत्त्वाचा कार्यक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, नायब तहसीलदार, कृषी अधिकारी, पंचायत समिती व नगर परिषद अधिकारी, मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, पोलीस पाटील तसेच विविध लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंडलनिहाय शिबिरांचे वेळापत्रक
मार्च २०२६ :
७ मार्च – पाबळ
१४ मार्च – वडगाव रासाई
२७ मार्च – निमोणे
एप्रिल २०२६ :
१० एप्रिल – तळेगाव ढमढेरे
१७ एप्रिल – मलठण
२४ एप्रिल – टाकळीहाजी
मे २०२६ :
८ मे – न्हावरा
१५ मे – टाकळीहाजी
२० मे – कोरेगाव भिमा
२८ मे – शिरूर
या शिबिरांमध्ये महसूल, कृषी व इतर विभागांच्या विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामध्ये प्रलंबित फेरफार व वारस नोंदी निकाली काढणे, जिवंत 7/12 मोहिम, उत्पन्न-रहिवासी-जात दाखले, सामाजिक योजनांसाठी अर्ज, नमुना ६, ७, ८ स्वीकारणे, जमीन भोगवटा वर्ग रूपांतरण, 7/12 दुरुस्ती, घरकुल पट्टे वाटप, ई-मोजणी, पीएम किसान नोंदणी, तक्रार निवारण तसेच कृषी विभागाच्या योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.
या अभियानाद्वारे शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविणे व महसूल विषयक प्रश्न त्वरित निकाली काढणे हा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. शिरूर तालुक्यातील नागरिकांनी आपल्या मंडलातील निश्चित तारखेला आयोजित शिबिरात उपस्थित राहून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनमहसुल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

