शिरूर, दि. ११ (अरुणकुमार मोटे)
टाकळी हाजी गटातील जिल्हा परिषद सदस्य पदासाठी इच्छुक असलेले बाळासाहेब डांगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सोडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने बेट भागातील आगामी जिल्हा परिषद निवडणुकीचे राजकीय समीकरण पूर्णतः बदलले आहे. या प्रवेशामुळे निवडणूक अधिकच चुरशीची होणार असून ती तिरंगी की चौरंगी होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून बाळासाहेब डांगे हे विविध माध्यमांतून आपली दावेदारी ठामपणे मांडत होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. मात्र, याच दरम्यान राजेंद्र गावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रचाराला वेग दिल्याने डांगे समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली.
या पार्श्वभूमीवर बाळासाहेब डांगे यांनी आपल्या समर्थकांसह थेट मुंबई गाठत बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. त्यामुळे बेट भागातील राजकीय गणिते पुन्हा एकदा नव्याने मांडली जात असल्याचे चित्र आहे.
दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्याने शरदचंद्र पवार गटाकडून दावेदार मानले जाणारे दामू अण्णा घोडे आता कोणती भूमिका घेतात, पक्षश्रेष्ठी त्यांच्याबाबत काय निर्णय घेतात, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकीकडे शिवसेनेतून बाळासाहेब डांगे, दुसरीकडे राष्ट्रवादीकडून राजेंद्र गावडे, तसेच शरद पवार गटाचे उमेदवार दामुआप्णा घोडे शिवसेना शिंदे गटाकडून डॉक्टर सुभाष पोकळे हे उमेदवार मैदानात उतरल्यास ही निवडणूक तिरंगी नव्हे तर चौरंगी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे टाकळी हाजी गटासह संपूर्ण बेट भागात आगामी जिल्हा परिषद निवडणूक ही केवळ स्थानिक नसून प्रतिष्ठेची आणि दिशादर्शक लढत ठरणार असल्याचे स्पष्ट होत असून, पुढील काही दिवसांत घडणाऱ्या राजकीय घडामोडींवर संपूर्ण तालुक्याचे लक्ष केंद्रीत झाले आहे.



1 Comment
खुप छान