
शिरूर शहरालगत शिरूर ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील विकसित झालेल्या बाबुरावनगर या उपनगरातील मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्वर्गीय बाबुरावजी पाचर्णे यांच्या दूरदृष्टीतून मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडणारी घरे उपलब्ध व्हावीत आणि शिरूर शहराला पर्याय म्हणून बाबुरावनगरची उभारणी करण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळात सुमारे अडीच कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार योजना, शाळा, रस्ते अशा अनेक विकासकामांना चालना मिळाली होती.
मात्र त्यांच्या निधनानंतर बाबुरावनगरकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणात महसूल देणारा हा परिसर आज मूलभूत सुविधांअभावी त्रस्त झाल्याचे चित्र दिसत आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाकडून ओपन प्लॉटची देखभाल किंवा विकास तर होत नाहीच, उलट त्यांचे रूपांतर कचराकुंड्यांमध्ये होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. विशेषतः शिवसाई मंगल कार्यालय शेजारील मोकळ्या प्लॉटवर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत काही नागरिकांकडून कचरा टाकला जात असल्याचे दिसून येते.
यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत असून पायी जाणाऱ्या नागरिकांना नाकावर रुमाल धरून जावे लागते. कचरा साचल्यामुळे डास, रोगराई वाढण्याची भीतीही व्यक्त होत आहे. तसेच रात्रीच्या वेळी या मोकळ्या जागांचा गैरवापर होतो, असेही रहिवाशांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी मोकळ्या प्लॉटमध्ये गुरे बांधली जात असल्याने स्वच्छतेचा प्रश्न अधिक गंभीर बनत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, बाबुरावनगरमधील सर्व मोकळ्या जागांवर विजेचे दिवे व सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे आहे. त्यामुळे कचरा टाकणे, गैरप्रकार करणे यावर आळा बसेल आणि परिसरात सुरक्षिततेची भावना निर्माण होईल.
बाबुरावनगरचा नियोजनबद्ध विकास व्हावा, ओपन प्लॉटचे सुशोभीकरण करावे आणि स्वच्छता राखण्यासाठी ग्रामपंचायतीने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

