चौघांना अटक, १८ लाखांचा मुद्देमाल जप्त
रांजणगाव एमआयडीसी | (साहेबराव लोखंडे)
रांजणगाव एमआयडीसी जवळील खंडाळे माथा (ता. शिरूर) येथील एका इलेक्ट्रॉनिक कंपनीतील केबल वायर चोरी प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने मोठे यश मिळवले असून चौघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे १८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
२ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री कंपनीतील केबल वायर बंडल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शिक्रापूर येथील फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे —
१) विकास संतोष पवार (वय २७, रा. मुखई, इंदिरानगर, ता. शिरूर)
२) रोहित गणेश शिंदे (वय २०, रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर)
३) ओंकार फकीरा काळे (वय २०, रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर)
४) फैजान इमरान खान (वय २३, रा. भाग्योदय नगर, कोंढवा खुर्द, पुणे)
पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने रांजणगाव, शिक्रापूर व परिसरातील ५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला.
सखोल चौकशीत आरोपींनी चोरीचा माल फैजान खान याच्याकडे विकल्याची कबुली दिल्यानंतर त्यालाही अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीचा माल, मालवाहू कॅरी व दोन दुचाकी असा एकूण १८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासात या टोळीने ऑगस्ट २०२५ मध्येही अशाच प्रकारची चोरी केल्याचे निष्पन्न झाले असून, आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या यशस्वी कारवाईत पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस अंमलदार उमेश कुतवळ, योगेश गुंड, किशोर शिवणकर, होमगार्ड राहुल इचके, शैलेश जगताप, बारकु गोडसे व रामदास शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पुढील तपास सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे करीत आहेत.


