दोन बड्या नेत्यांच्या पक्षांतराची शक्यता…
शिरूर | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांमधील संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेनंतर आंबेगाव–शिरूर विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर येथील दोन बडे नेते लवकरच राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
जिल्हा परिषद निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारी प्रक्रियेत दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची महत्त्वाची भूमिका होती. मात्र त्यांच्या निधनानंतर काही स्थानिक नेत्यांना विश्वासात न घेतल्याची भावना निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांनी सुचवलेल्या उमेदवारांना अपेक्षित सहकार्य मिळाले नसल्याची चर्चा आहे.
निवडणूक काळात काही ठिकाणी स्थानिक नेतृत्वाने थेट अथवा अप्रत्यक्षपणे विरोधी उमेदवारांना मदत केल्याचे आरोप होत आहेत. विशेषतः शिरूर–आंबेगाव मतदारसंघात ही स्थिती अधिक ठळकपणे दिसून आल्याचे राजकीय जाणकार सांगतात.
निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यात वरवर विरोध दिसून येत असला, तरी प्रत्यक्षात काही नेते एकत्रितपणे काम करत असल्याची चर्चा आहे. अधिकृत उमेदवारांना पराभूत करण्यासाठी काही नेत्यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याचेही सांगितले जात आहे.
दरम्यान, अजित पवार गटातील एका नेत्याचे भाजपकडे, तर शरद पवार गटातील एका नेत्याचे शिवसेना (शिंदे गट) कडे झुकते माप असल्याची चर्चा परिसरात आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते लवकरच पक्षांतर करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीतून उमेदवारी न मिळाल्याने काही निष्ठावंत उमेदवारांनी पक्ष सोडून इतर पक्षांमध्ये प्रवेश केला. त्यांच्या सोबत मोठ्या प्रमाणावर कार्यकर्तेही गेले. विशेष म्हणजे, आंबेगावमधील दोन्ही प्रमुख नेतृत्वांनी त्यांना रोखले नाही, उलट अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याचे बोलले जात आहे.
अजित पवार यांचे निधन आणि राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा यांचे राजकीय भांडवल करून हे नेते आपापल्या सोयीप्रमाणे भूमिका घेत असल्याची चर्चा होत आहे. या घडामोडींमुळे आगामी काळात आंबेगाव–शिरूर मतदारसंघातील राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता असून, राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था येथे कमकुवत होण्याची चिन्हे दिसत आहेत.


