शिरूर | (साहेबराव लोखंडे)
शिरूर तालुक्यातील माळवाडी येथील मीनल सायन्स ॲकॅडमीच्या वतीने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला निरोप समारंभ, करिअर मार्गदर्शन व पालक मेळावा उत्साहात पार पडला. रविवार, दि. ८ फेब्रुवारी रोजी वृक्षावन फार्महाऊस येथे दोन सत्रांत हा कार्यक्रम झाला.कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात संस्थेची ओळख करून देण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करण्यात आले. स्व. मीनल ताई यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेल्या या संस्थेमार्फत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणसेवा दिली जात आहे.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून साईबाबा संस्थान शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर (आयएएस) उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. प्रमुख मार्गदर्शक योगेश पुंड यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.यावेळी मीनल सायन्स ॲकॅडमीच्या वतीने शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली. प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीला मीनल सागर शिक्षण स्कॉलरशिप (MSES) तर प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला साईनाथ सागर शिक्षण स्कॉलरशिप (SSES) अंतर्गत ५,००१ रुपये, मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना अत्यल्प किंवा विनामूल्य शुल्कात शिक्षण देण्याची जबाबदारी संस्था घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
संस्थापक अनिकेत भाकरे यांनी सांगितले की, कोरोना काळात सुरू झालेल्या या उपक्रमातून आज अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळत आहे. अध्यक्षीय भाषणात साईनाथ कानडे यांनी पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.कार्यक्रमात अग्निवीरमार्फत सैन्यदलात निवड झालेल्या संस्कृत रेणुका रसाळ यांच्या पालकांचा विशेष सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मनोगताने उपस्थितांना भावूक केले.
सांस्कृतिक कार्यक्रमांत अजिंक्य भाकरे यांच्या गायनास विशेष प्रतिसाद मिळाला. नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमात रंगत भरली. सूत्रसंचालन पूर्वा भाकरे व साहिल पवार यांनी केले.कार्यक्रमास अजित कापसे, मुकुंद चासकर, अभिजीत भाकरे, सुनील भाकरे, स्वप्निल भाकरे, योगेश भाकरे, अरुण भाकरे, राहुल भाकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विद्यार्थ्यांसाठी नवे उपक्रम राबविणार
वैदिक शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ शालेय शिक्षण न देता त्यांना व्यवसायिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये यशस्वी व्यक्ती व संस्थांना भेटी, व्यावसायिक क्षेत्रांचा अभ्यास तसेच मागास व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना अत्यल्प किंवा विनामूल्य शिक्षण देण्याचा संस्थेचा मानस आहे.
— अनिकेत भाकरे, संस्थापक मीनल सायन्स ॲकॅडमी



