कान्हूर मेसाई | (सुनिल जिते)
शिरूर तालुक्यातील संवेदनशील मानल्या जाणाऱ्या रांजणगाव गणपती गटात सुरू असलेल्या ‘काटे की टक्कर’ लढतीत प्रत्येक मताला विशेष महत्त्व आहे. अशा परिस्थितीत स्वतःच्या लग्नाच्या दिवशीही ‘आधी मतदान, मग लग्न’ असा निर्धार करत कान्हूर मेसाई येथील नवरदेव गणेश खर्डे यांनी मतदानाचा हक्क बजावला.
आज शनिवारी ( दि.७फेब्रुवारी) सायंकाळी सहा वाजता त्यांचे लग्न असतानाही आणि घरात लगीनघाई सुरू असतानाही, त्यांनी वेळ काढून प्रथम घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार वापरण्याचा निर्णय घेतला.
लग्नासाठी शेरवानी परिधान करून ते थेट कान्हूर मेसाई येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर पोहोचले आणि मतदान केले. रांजणगाव गटातील निवडणूक अत्यंत चुरशीची असल्याने एका-एका मताचा हिशोब लावला जात आहे. अशा परिस्थितीत नवरदेवाने केलेले मतदान नागरिकांमध्ये लोकशाहीविषयी जागरूकतेचे उदाहरण ठरले.
या घटनेची कान्हूर मेसाई परिसरात जोरदार चर्चा होत आहे. ‘मतदान हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे’ हा संदेश नवरदेवाने आपल्या कृतीतून दिल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


