टाकळी हाजी : (साहेबराव लोखंडे)
मोबाईल फोनने आज मानवी जीवनात क्रांती घडवून आणली असली, तरी त्याचा अतिवापर सध्या चिंतेचा विषय बनत चालला आहे. गावा- गावांमध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच घटक मोठ्या प्रमाणावर मोबाईलमध्ये गुंतलेले दिसून येत आहेत. घरात असो वा बाहेर, शेतात काम करताना असो वा दुकानात बसताना, प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसून येत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे.
पूर्वी गावातील चौक, मंदिर परिसर, चावडी, बसस्थानक, बाजारपेठ अशा ठिकाणी नागरिक एकत्र येऊन विविध विषयांवर चर्चा करत असत. सामाजिक, राजकीय, शेतीविषयक तसेच कौटुंबिक प्रश्नांवर मुक्तपणे संवाद होत असे. मात्र आता या ठिकाणी बसलेली टोळकीही एकमेकांशी संवाद न साधता मोबाईलच्या स्क्रीनमध्ये गुंतलेली दिसून येत आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष संवाद कमी होऊन मानवी नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होत असल्याचे जाणकारांचे मत आहे.
सध्या सुरू असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. उमेदवार, कार्यकर्ते आणि समर्थक फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, यूट्यूब यांसारख्या माध्यमांद्वारे प्रचार करत असून, विविध व्हिडिओ, पोस्ट, संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवले जात आहेत. यामुळे प्रचार अधिक वेगवान झाला असला, तरी चुकीची माहिती, अफवा आणि अपप्रचारही वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
लहान मुलांमध्ये मोबाईल गेम्स आणि व्हिडिओ पाहण्याचे प्रमाण वाढले असून, त्याचा थेट परिणाम त्यांच्या अभ्यासावर आणि आरोग्यावर होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. अनेक मुले मैदानावर खेळण्याऐवजी घरी बसून मोबाईलवर वेळ घालवताना दिसत आहेत. त्यामुळे शारीरिक हालचाल कमी होऊन विविध आजारांचा धोका वाढत आहे.
तरुणाईही मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाच्या आहारी गेली असून, रील्स, चॅटिंग आणि ऑनलाइन मनोरंजनात अधिक वेळ घालवताना दिसत आहे. काही तरुण दिवसातील अनेक तास मोबाईलवर घालवत असल्याने त्यांच्या कामावर, शिक्षणावर आणि कौटुंबिक जीवनावर परिणाम होत असल्याचेही निदर्शनास येत आहे.
शेतकरी, व्यावसायिक आणि कामगार वर्गासाठी मोबाईल उपयुक्त ठरत असला, तरी त्याचा अतिरेक टाळणे गरजेचे असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत. ताज्या घडामोडी, हवामानाचा अंदाज, बाजारभाव, शासकीय योजना यांची माहिती मोबाईलमुळे सहज मिळत असली, तरी सतत सोशल मीडियावर राहिल्याने वेळेचे नियोजन बिघडत आहे.
ज्येष्ठ नागरिक भाऊसाहेब घोडे यांनी याबाबत चिंता व्यक्त करताना सांगितले की, पूर्वी गावातील लोक एकत्र येऊन सण-उत्सव, सुख-दुःख साजरे करत असत. एकमेकांच्या अडचणी जाणून घेऊन मदतीस धावून जात असत. मात्र आता मोबाईलमुळे माणसांमधील संवाद कमी झाला असून, माणूस एकाकी होत चालला आहे.
शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि सुज्ञ नागरिकांनी मोबाईलच्या समतोल वापरावर भर देण्याची गरज व्यक्त केली आहे. मोबाईलचा उपयोग शिक्षण, माहिती आणि संपर्कासाठी व्हावा, मात्र त्याचा गैरवापर टाळला गेला पाहिजे. कुटुंबीयांनी एकत्र वेळ घालवणे, मुलांना खेळासाठी प्रोत्साहन देणे, सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग वाढवणे यामुळे मोबाईलच्या वाढत्या वापरावर नियंत्रण नक्कीच मिळवता येईल.तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास तो प्रगतीचा मार्ग ठरेल, मात्र त्याचा अतिरेक समाजासाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे मोबाईलचा विवेकपूर्ण आणि मर्यादित वापर ही आजची काळाची खरी गरज असू शकते.


