शिरूर | बापू जाधव
आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणाऱ्या लोकनेते अजितदादा पवार यांना नियतीची दृष्ट लागली. महाराष्ट्राला हेवा वाटावा अशी विकासकामे आपल्या भागात केवळ अजितदादांमुळेच झाली, ही जाणीव प्रत्येक नागरिकाने ठेवावी. येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये फक्त घड्याळ या चिन्हापुढील बटण दाबून अजितदादांचा विचार जिवंत ठेवण्याचे ऐतिहासिक काम करा, असे आवाहन लोकनेते आर. बी. जगदाळे पाटील यांनी केले.
शिरूर ग्रामीण–न्हावरे जिल्हा परिषद निवडणुकीनिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते. न्हावरे व शिरूर ग्रामीण पंचायत समिती गणातील प्रत्येक गावात शेकडो कार्यकर्त्यांचा फौजफाटा घेऊन आर. बी. जगदाळे पाटील यांनी दौरे काढत संपूर्ण परिसरात राजकीय वातावरण ढवळून काढले आहे.
अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर सर्वत्र शोककळा पसरली असून, अशा दुःखद वातावरणातही विविध ठिकाणी शोकसभा आयोजित करण्यात येत आहेत. या शोकसभांमध्ये मनोगत व्यक्त करताना आर. बी. जगदाळे पाटील यांनी वेळोवेळी अजितदादांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला.
“अजितदादांनी सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवून आणला. सिंचन, रस्ते, शिक्षण, सहकार अशा विविध क्षेत्रांत त्यांनी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. त्यामुळे या कठीण काळात आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांशी ठामपणे उभे राहिले पाहिजे,” असा निर्धार त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला.या सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.


