शोकसभेत आठवणींच्या भावनांचा फुटला बांध
शिरूर | (सुनिल जिते)
उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्रासह शिरूर तालुक्यात शोककळा पसरली असून, या दु:खद घटनेच्या पार्श्वभूमीवर रविवारी (ता. १) शिरूर येथे सहकार क्षेत्रातील सचिवांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती.
शिरूरच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार असलेल्या अजित पवार यांच्या निधनाने एक कर्तबगार, दूरदृष्टी असलेला व जनतेसाठी अखंड झटणारा लोकनेता हरपल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यांच्या जाण्याने सहकार क्षेत्राची अपूरणीय हानी झाली असून, संवेदनशील नेतृत्वाचा आधार हरपल्याचे मत विविध कार्यकारी सोसायट्यांमध्ये कार्यरत सचिवांनी व्यक्त केले.
अजितदादा पवार हे सहकार चळवळीशी अतूट नाते जपणारे नेते होते. सहकारी साखर कारखाने, बँका, पतसंस्था, विविध कार्यकारी संस्था तसेच कृषी आधारित सहकारी संस्थांच्या विकासात त्यांची भूमिका नेहमीच निर्णायक राहिली. विविध कार्यकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या सचिवांना त्यांनी नेहमी न्याय दिला, असे उपस्थितांनी सांगितले.
श्रद्धांजली सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी आदरांजली वाहिली. यावेळी शिरूरचा नियोजनबद्ध विकास, पायाभूत सुविधा, औद्योगिक प्रगती तसेच नागरिकांच्या जीवनमानात झालेला सकारात्मक बदल हा अजित पवार यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा ठसा असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. उपस्थितांनी दिवंगत नेत्यास श्रद्धांजली अर्पण केली.
अजितदादांच्या विचारांचा व विकासात्मक दृष्टिकोनाचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. या सभेस शिरूर तालुका सचिव संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पवार, सचिव कैलास लोहार, अनिल वाबळे, सुभाष सातकर, खंडू जगताप, सुखदेव खर्डे यांच्यासह तालुक्यातील विविध कार्यकारी संस्थांवर कार्यरत असलेले अनेक सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


