शिरूर दि. २७ ( अरुणकुमार मोटे)
चोरट्यांनी आता देवाच्याच दारात चोऱ्या करण सुरु केल असून या घटनांमध्ये दिवसेंदिवस मोठी वाढ होऊ लागली आहे! पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री सोमेश्वर मंदिरात चोरट्यांनी थेट दानपेटीच लांबवल्याची धक्कादायक घटना(
दि. २३ ) रोजी समोर आली असून चार दिवस उलटूनही न कारेगाव -रांजनगाव एमआयडीसी पोलिसांना अद्याप या चोरट्यांना गजाआड करता आले नाही.
भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र असलेल्या मंदिरातच चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. २३ च्या रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनीपरिसरात प्रवेश करत थेट गर्भगृहाजवळ ठेवलेली दानपेटी उचलून नेली. ही संपूर्ण घटना मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दानपेटीत भाविकांनी अर्पण केलेली रोकड असण्याची शक्यता असून नेमका किती ऐवज चोरीला गेला याचा तपास सुरू आहे.
या प्रकारामुळे ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. देवस्थानातील दानपेटीही सुरक्षित नसेल, तर सामान्य नागरिकांच्या घरांची सुरक्षा काय? असा थेट सवाल उपस्थित होत आहे. श्रद्धेच्या ठिकाणी अशा घटना घडत असल्याने सामाजिक सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

