कान्हूर मेसाई, ( ता. ११) | सुनिल जिते
शिरूर तालुक्यातील पश्चिम पट्यात असलेल्या मिडगुलवाडी परिसरात कवठे येमाई घाटात दुचाकीवरून घरी परतणाऱ्या तरुणावर बिबट्याने अचानक झेप घेतल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. १०) सायंकाळी घडली. या हल्ल्यात कृष्णा बबन जाधव (वय ३०, रा. मिडगुलवाडी) हा युवक गंभीर जखमी झाला आहे.
कृष्णा जाधव हा युवक कवठे येमाई येथून मिडगुलवाडीकडे दुचाकीवरून जात असताना सायंकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास घाटातील चढावर रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने थेट त्याच्यावर झेप घेत हल्ला केला. बिबट्याने त्याच्या मान, गळा व हातावर पंजे मारत गंभीर जखमा केल्या. मात्र, जाधव याने प्रसंगावधान राखत शर्थीचा प्रतिकार करत बिबट्याचा हल्ला परतवून लावत आपला जीव वाचवला.
दरम्यान, पाठीमागून येत असलेल्या सागर मिडगुले या युवकाने रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेला कृष्णा जाधव याला पाहून इतर नागरिकांच्या मदतीने तात्काळ हालचाल करत त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती आज सकाळी शिरूर वन विभागाला देण्यात आल्यानंतर जखमी युवकास पुढील उपचारासाठी मंचर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी युवकाची प्रकृती सध्या स्थिर आहे. घटनेची माहिती मिळताच शिरूरचे वनपाल नितीन म्हात्रे, वनरक्षक नारायण राठोड व वनकर्मचारी हनुमंत कारकूड यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या घटनेमुळे मिडगुलवाडी व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून घाट परिसरात वन्यप्राण्यांच्या वाढत्या हालचालींमुळे सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


