शिरूर दि. २४ ( अरुणकुमार मोटे)
जिल्हा परिषद निवडणुकांच्या रणधुमाळीत शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी–कवठे येमाई गट सध्या संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेत असून, या गटातून चार मातब्बर नेत्यांनी तूल्यबळ शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वातावरण अक्षरशः पेटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केलेले राजेंद्र पोपटरााव गावडे आणि त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी दामूआण्णा घोडे, बाळासाहेब डांगे व डॉ. सुभाष पोकळे यांच्यात थेट प्रतिष्ठेची लढत उभी ठाकली आहे.
चारही उमेदवारांच्या अर्ज दाखल प्रक्रियेदरम्यान बेट भागातील शेकडो कार्यकर्ते, युवक, महिला व ग्रामस्थ रस्त्यावर उतरल्याने शिरूर शहरासह परिसरात दिवसभर वाहनांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. दुचाकी-चारचाकी ताफे, फटाके, घोषणाबाजी आणि शक्तीप्रदर्शनामुळे ही अर्ज दाखल प्रक्रिया एखाद्या प्रचार सभेसारखीच भासली.
तिकिट कापल्याने राजेंद्र गावडे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झाल्याने या गटातील राजकीय गणिते पूर्णपणे बदलली असून, “ही लढत आता पक्षीय नसून सत्ताकेंद्रासाठीची आहे,” अशी प्रतिक्रिया जाणकारांतून व्यक्त होत आहे.
पारंपरिक वैराला पुन्हा धार….
राजेंद्र गावडे,दामूआण्णा घोडे, बाळासाहेब डांगे आणि डॉ. सुभाष पोकळे यांनीही आपापल्या समर्थकांची ताकद दाखवत ‘आम्हीही मैदानात आहोत’ असा स्पष्ट संदेश दिला. या चौघांचाही बेट भागात स्वतंत्र जनाधार असून, ग्रामपातळीवर त्यांच्या समर्थकांची मजबूत फळी आहे. त्यामुळे ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यांपेक्षा वैयक्तिक राजकीय वजन आणि संघटनात्मक ताकदीची कसोटी ठरण्याची शक्यता अधिक आहे.
या संपूर्ण प्रक्रियेत सर्वाधिक चर्चा होत आहे ती गावडे घराण्याच्या भूमिकेची. राजकीय जाणकारांच्या मते, “गावडे घराण्याची उमेदवारी कापणे हा साधा राजकीय निर्णय नसून, एका निष्ठावंत कुटुंबाला योजनाबद्धरीत्या संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही राजकीय लढाई नसून सरळसरळ राजकीय हत्या आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
गावडे कुटुंबाने गेल्या अनेक दशकांत बेट भागात सहकार, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये अशा निष्ठावंत कुटुंबांनाच बाजूला केले जात असल्याचा रोष कार्यकर्त्यांमध्ये उफाळून आला आहे.
भाजप–राष्ट्रवादी संघर्षाची वेगळी झलक….
राजेंद्र गावडे यांच्या अचानक भाजप प्रवेशामुळे हा गट आता केवळ स्थानिक न राहता भाजप–राष्ट्रवादी संघर्षाचे केंद्र बनला आहे. “ही निवडणूक म्हणजे आगामी राजकारणाची वेगळी रंगीत तालीम आहे,” असे मत राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरील नेत्यांचेही लक्ष या गटाकडे लागले आहे.
चारही बलाढ्य उमेदवारांमुळे मतदारांमध्ये संभ्रम असला तरी उत्सुकता प्रचंड वाढली आहे. विकासकामे, पाणीटंचाई, रस्ते, आरोग्य सुविधा हे मुद्दे चर्चेत असले तरी शेवटी मतदार कोणाच्या पाठीशी उभा राहणार, हे उमेदवारांच्या प्रत्यक्ष संपर्कावर आणि प्रचारातील आक्रमकतेवर अवलंबून राहणार आहे.
अर्ज दाखल झाल्यानंतर आता प्रचाराचे रणसंग्राम सुरू झाले असून आरोप-प्रत्यारोप, शक्तीप्रदर्शन आणि राजकीय डावपेच यामुळे येत्या काही दिवसांत बेट भागातील राजकारण अधिकच तापणार आहे.
एकूणच टाकळी हाजी–कवठे येमाई जिल्हा परिषद गटातील ही लढत केवळ एका जागेपुरती मर्यादित न राहता, शिरूर तालुक्याच्या राजकीय दिशेचा फैसला करणारी ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

