शिरूर | राजकारण म्हणजे केवळ सत्तेची गणितं नव्हे, तर माणसांशी नातं जोडण्याची जबाबदारी आहे, हे शिरूर तालुक्याच्या बेट भागात पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील माजी आदर्श सरपंच व सध्या जिल्हा परिषद सदस्यपदाचे उमेदवार दामूशेठ धोंडीबा घोडे उर्फ दामू आण्णा यांच्या समाजाभिमुख उपक्रमाने जनतेच्या मनात विश्वासाचं स्थान निर्माण केलं आहे.
“प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होऊन यथाशक्ती योगदान देणे” हा त्यांचा उपक्रम केवळ सामाजिक उपक्रम न राहता, लोकाभिमुख नेतृत्वाचा आदर्श ठरत आहे. लग्नसोहळे, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम असोत किंवा घरातील दुःखद प्रसंग— दामू आण्णा स्वतः उपस्थित राहून कुटुंबीयांच्या भावना समजून घेतात. नवदांपत्याचा सन्मान, पालकांचा आदर आणि प्रेमपूर्वक भेटवस्तू देत ते सामाजिक बांधिलकी जपताना दिसतात.
या उपक्रमामागे कोणताही राजकीय दिखावा नसून, सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवणारी भूमिका असल्याचे नागरिक स्पष्टपणे सांगतात. त्यामुळेच त्यांच्या कृतींचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, “माणुसकीचा लोकनेता” अशी ओळख त्यांना मिळत आहे.
एका स्थानिक नागरिकाने प्रतिक्रिया देताना सांगितले, “दामू आण्णा निवडणुकीपुरते आमच्याकडे येत नाहीत. आमच्या घरातल्या प्रत्येक आनंद-दुःखाचे ते आपलेपणाने साक्षीदार असतात.”
या उपक्रमामुळे परिसरातील युवकांमध्येही सकारात्मक संदेश जात असून, समाजकारणातून राजकारणाकडे जाण्याचा मार्ग कसा असावा, याचा आदर्श निर्माण झाला आहे. “माणसं जिंका, मग निवडणुका आपोआप जिंकल्या जातात” हा विचार त्यांच्या कामातून प्रत्यक्षात उतरताना दिसतो.
दामू आण्णा घोडे हे सध्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात असून, त्यांच्या या सातत्यपूर्ण लोकसंपर्क, संवेदनशीलता आणि सामाजिक कार्यामुळे “असा विश्वासार्ह आणि आपुलकी जपणारा लोकप्रतिनिधी जिल्हा परिषदेत असायलाच हवा” अशी भावना मतदारांमध्ये बळावत आहे. विकासाबरोबरच माणुसकी जपणारे हे नेतृत्व बेट भागातील राजकारणाला नवी दिशा देत असल्याचे चित्र आहे.


