शिरूर दि. २२ ( अरुणकुमार मोटे) : ड्रग्स प्रकरणात अटकेत असलेला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलिस हवालदार श्यामसुंदर गुजर आणि आरोपी प्रकरणात ड्रग्सचा माल पुरवणारा माऊली शिंदे (रा. कोहकडी, ता. पारनेर) यांच्यातील संबंध केवळ अंमली पदार्थांपुरते मर्यादित नसून, मागील वर्षभरापासून सुरू असलेल्या अनेक काळ्या धंद्यांपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक माहिती विश्वासार्ह सूत्रांकडून समोर येत आहे. विशेष म्हणजे या बेकायदेशीर व्यवहारात आरोपी शिंदे याचा भाऊही सक्रियपणे सामील असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असून, तपासाची व्याप्ती आता अधिक व्यापक करण्याची आवशक्यता निर्माण झाली आहे. शिंदे हा जाणीवपूर्वक भावाला गुन्हातून लपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा भाऊ अनेक ड्रग्स विक्रेत्यांच्या संपर्कात असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस हवालदार गुजर हा गेल्या वर्षभरापासून शिंदे यांच्या सतत संपर्कात होता. या काळात ड्रग्सची वाहतूक, गुटखा निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची तस्करी, तसेच हायवेवर मालाची लूट करून त्याची परराज्यात विक्री अशा विविध बेकायदेशीर कारवाया केल्या जात होत्या. विशेष म्हणजे, गुटखा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी लाल सुपारी ही नगरमार्गे गुजरातकडे पाठवली जात असल्याचेही तपासात पुढे येत आहे.
या संपूर्ण नेटवर्कमध्ये पोलिस हवालदार गुजर याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले जाते. पोलीस यंत्रणेतील पदाचा गैरवापर करत गुजरकडून हायवेवरील हालचालींची माहिती, तपास यंत्रणांचे वेळापत्रक आणि तपास टाळण्यासाठी आवश्यक ‘संरक्षण’ दिले जात होते, असा संशय व्यक्त केला जात आहे. गुजरच्या मदतीनेच शिंदे बंधू हायवेवर जाणाऱ्या मालवाहू वाहनांची लूट करत आणि हा माल थेट कर्नाटक राज्यात नेऊन विक्री करत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी याबाबतीतही तपास करण्याची मागणी आता पुढे येत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, ड्रग्ज प्रकरणात शिंदे याला अटक झाल्यानंतरही त्याचा भाऊ पोलीस स्टेशनला भावाला भेट देण्यासाठी उपस्थित राहिलेला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदे याचा भाऊ सध्या कर्नाटक राज्यात पळून गेल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांकडे असून, त्यामुळे त्याच्यावर संशय अधिक बळावला आहे. तपास यंत्रणांनी या हालचालींची गंभीर दखल घेण्याची गरज असून, संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्याची मागणी होत आहे.
ड्रग्जसह इतर अनेक काळ्या धंद्यांमध्ये शिंदे आणि त्याचा भाऊ दोघेही सहभागी असल्याचे पुरावे मिळत असल्याने, केवळ एका आरोपीवर कारवाई करून हे प्रकरण थांबवून जमणार नाही, शिरूर डिजिटल. कॉम याचा सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार आहे. आतापर्यंत कोट्यावधींचे कोणा कोणाला हे ड्रग्स विकले त्यांनाही यात आरोपी करणे महत्त्वाचे आहे. शिंदे याच्या भावालाही तातडीने ताब्यात घेऊन सखोल चौकशी करणे अत्यावश्यक असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे पोलिस खात्यात मोठी खळबळ उडाली असून, एका पोलिस कर्मचाऱ्याचा थेट गुन्हेगारी नेटवर्कमध्ये सहभाग उघड झाल्याने पोलीस यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वरिष्ठ स्तरावरून या प्रकरणाचा कसून तपास करण्याचे आदेश दिले जाण्याची शक्यता असून, पुढील तपासात आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, तपास यंत्रणा सर्व बाबींची पडताळणी करत असून, दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे संकेत अधिकृत सूत्रांनी दिले आहेत. गेल्या कित्येक दिवसापासून शिरूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात या ड्रग्जची विक्री होत होती व तरुणाई बिघडत चाललेली होती.त्यामुळे कठोर कारवाई करण्याची मागणी पालक वर्गाकडून होत आहे. या प्रकरणात अजून बऱ्याच आरोपींची संख्या वाढणार असून शिरूर पोलीस आता निरपेक्ष कारवाई करून किती जणांना यामध्ये गजाआड करतात हेही पाहणे महत्वाचे आहे. गुजरला अजून किती पोलिस अधिकाऱ्यांची साथ होती याचाही तपास करण्याची मागणी पुढे येत आहे.प्रकरण केवळ ड्रग्जपुरते न राहता, राज्यांतर्गत आणि आंतरराज्य काळ्या धंद्यांच्या मोठ्या साखळीपर्यंत पोहोचणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सर्व प्रकरणांमध्ये शिरूर डिजीटल.कॉम बारकाईने लक्ष ठेवून असून गुजर व शिंदे बंधूंच्या काळ्या धंद्यांचा पर्दाफाश करणार आहे.( क्रमशः )


