जप्त केलेला ‘एमडी’ मुद्देमाल विकल्याचा धक्कादायक प्रकार
शिरूर, दि. २२ (अरुणकुमार मोटे)
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलिसांनी उघडकीस आणलेले सुमारे वीस कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज प्रकरण आता केवळ अंमली पदार्थ तस्करीपुरते मर्यादित न राहता थेट पोलीस यंत्रणेतील काळ्या कारभारावर प्रकाश टाकणारे ठरले आहे. या प्रकरणात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचारी श्यामसुंदर रामदास गुजर (वय ३९, रा. नेप्ती, ता. नगर) याला अटक करण्यात आल्याने राज्याच्या गृहखात्यात खळबळ उडाली आहे.
शिरूर तालुक्यात एमडी ड्रग्ज जप्तीच्या तपासादरम्यान या रॅकेटचे धागेदोरे थेट अहिल्यानगरपर्यंत पोहोचले. सखोल तपासात धक्कादायक बाब समोर आली की, ड्रग्जचा पुरवठा करणारा कुठलाही सराईत गुन्हेगार नसून, तो स्वतः पोलिस कर्मचारी आहे. यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गुजर याला अहिल्यानगर पोलिस अधीक्षक कार्यालयातील स्थानिक गुन्हे शाखेतून ताब्यात घेऊन अटक केली.
जप्त मुद्देमालातूनच ड्रग्जची विक्री
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्यामसुंदर गुजर हा अहिल्यानगर जिल्ह्यात जप्त करण्यात आलेल्या एमडी ड्रग्जच्या मुद्देमालातून काही प्रमाणात ड्रग्ज बाहेर काढून काळ्या बाजारात विक्री करत होता. विशेष म्हणजे, अंमली पदार्थांविरोधात कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिस यंत्रणेतीलच एक कर्मचारी या अवैध व्यापारात सहभागी असल्याने हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात आहे.
गुजर हा स्थानिक गुन्हे शाखेत नार्को टेस्ट व अंमली पदार्थांच्या मुद्देमालाशी संबंधित काम पाहत होता. अहिल्यानगर पोलिस अधीक्षक कार्यालयात जप्त अंमली पदार्थांसाठी स्वतंत्र मुद्देमाल कक्ष असून, त्याची चावी मुख्यालयात जमा असणे अपेक्षित असते. मात्र, प्रत्यक्षात ही चावी गुजरकडेच असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
मैदा भरून संशय टाळण्याचा प्रकार
तपासात असेही उघड झाले आहे की, जप्त केलेल्या ड्रग्जच्या ऐवजी तितक्याच वजनाचा मैदा भरून तो मुद्देमालात ठेवत होता, त्यामुळे दीर्घकाळ कोणाचाही संशय येत नव्हता. विभागाशी संबंधित पत्रव्यवहार, नोंदी व हालचालीदेखील तोच हाताळत असल्याने त्याने अधिकाराचा व विश्वासाचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केल्याचा आरोप आहे.
संयुक्त तपास सुरू, मोठे खुलासे अपेक्षित
अटकेनंतर पुणे ग्रामीण व अहिल्यानगर पोलिसांनी संयुक्तपणे गुजरची चौकशी सुरू केली आहे. त्याने यापूर्वी किती वेळा आणि किती प्रमाणात ड्रग्ज बाहेर काढले, या ड्रग्जची विक्री कोणाला केली, तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोण सहभागी आहेत का, याचा सखोल तपास सुरू आहे. पुढील तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कठोर कारवाईचे संकेत
या प्रकरणामुळे संपूर्ण पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाल्याची भावना व्यक्त होत असून, अहिल्यानगर पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुजरविरोधात कठोर विभागीय व फौजदारी कारवाईचे संकेत दिले आहेत. गरज भासल्यास त्याला सेवेतून बडतर्फ करण्याची प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पूर्वीपासूनच वादग्रस्त कारकीर्द
श्यामसुंदर गुजर याची यापूर्वी पारनेर पोलिस ठाण्यातील कारकीर्दही वादग्रस्त ठरली होती. त्याच्याविरोधात काही सामाजिक संघटनांनी निवेदने दिली होती. याच काळात त्याचे अंमली पदार्थ तस्करांशी संबंध निर्माण झाले असावेत, अशी शक्यता तपास यंत्रणा व्यक्त करत आहे.
दरम्यान, श्रीरामपूर व संगमनेर परिसरातील कोट्यवधींच्या ड्रग्ज प्रकरणांचे धागेदोरेही स्थानिक गुन्हे शाखेपर्यंत पोहोचत असल्याने, हे रॅकेट शिरूरपुरते मर्यादित नसून व्यापक स्वरूपाचे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचा पारदर्शक आणि निष्पक्ष तपास व्हावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.


