शिरूर दि. १९( अरुणकुमार मोटे)
सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म, बी. फार्म, एम. फार्म), इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन आळेफाटा लोकल ब्रांच तसेच नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली राज्यस्तरीय फार्मा मॉडेल मेकिंग स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडली.
या स्पर्धेत राज्यभरातील ३८ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपली कल्पकता, संशोधनवृत्ती आणि तांत्रिक कौशल्य सादर केले. फार्मसी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संकल्पनांना व्यासपीठ देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डि. फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमोल शहा, बी. व एम. फार्मसीचे प्राचार्य डॉ. सचिन कोठावदे, शिरूर एस. टी. सी. ओ. पी. एन. ॲल्युमिनी असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. बाबाजी गलांडे, नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन, पुणेचे अध्यक्ष डॉ. सचिन कोतवाल, जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, हडपसरचे प्राचार्य डॉ. प्रफुल्ल आडकऱ, गेनबा सोपानराव मोझे कॉलेज ऑफ फार्मसी, वाघोलीचे प्राचार्य डॉ. तुषार शेळके, पुष्पराज कोळपकर, शितल खंडागळे मॅडम, डॉ. जे. पी. सूर्यवंशी यांच्यासह विविध महाविद्यालयांतील प्राध्यापकवृंद उपस्थित होते.
उद्घाटनानंतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना फार्मसी क्षेत्रातील संशोधनाचे महत्त्व, आधुनिक औषधनिर्मिती प्रक्रिया, नाविन्यपूर्ण संकल्पना आणि व्यावहारिक ज्ञान यावर भर दिला. केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने समाजोपयोगी व उपयुक्त मॉडेल्स विकसित करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्मार्ट ड्रग डिलिव्हरी सिस्टीम, नवीन औषध वितरण प्रणाली, ऑस्मोटिक ड्रग डिलिव्हरी, बायोटेक्नॉलॉजी, नियंत्रित औषध मुक्तता प्रणाली तसेच विविध फार्मास्युटिकल उपकरणांवर आधारित मॉडेल्स सादर केली. विद्यार्थ्यांच्या सर्जनशील कल्पना आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचे दर्शन घडविणारी ही स्पर्धा ठरली.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून जे. पी. सूर्यवंशी, शितल खंडागळे, विशाल कारखिले आणि मोहन शितोळे यांनी काम पाहिले. प्रत्येक मॉडेलचे संकल्पना, कार्यपद्धती, सादरीकरण आणि उपयुक्तता या निकषांवर सखोल व निष्पक्ष मूल्यमापन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाबाबत परीक्षक मंडळाने विशेष समाधान व्यक्त केले.
स्पर्धेचा निकाल
डि. फार्मसी विभाग :
प्रथम पारितोषिक : विशाल जुन्नर सेवा मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, आळे – श्रद्धा चौधरी व तन्मय चव्हाण
द्वितीय पारितोषिक : अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी, अहिल्यानगर – पूर्वा गोरे व भाग्यश्री गुट्टेरकर
तृतीय पारितोषिक : मातोश्री राधा कॉलेज ऑफ फार्मसी, विरगाव – ऋषिकेश शेळके
उत्तेजनार्थ पारितोषिक : सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी (डि. फार्म), शिरूर – अनुष्का जगदाळे व श्रेया थोरात
बी. फार्मसी व एम. फार्मसी विभाग :
प्रथम पारितोषिक : सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी, शिरूर – रिया अग्रहरी व प्रणव बडगुजर
द्वितीय पारितोषिक : विशाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, आळे – ओम खैरे व केतकी गोमसे
तृतीय पारितोषिक : AISSMS कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे – अनुष्का साकोरे व तानिया घाणेकर
उत्तेजनार्थ पारितोषिक : प्रवरा रूरल कॉलेज ऑफ फार्मसी, लोणी – अंजली पवार व तृप्ती सोनवंशी
प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे १५००, १००० व ७०० रुपये रोख, प्रमाणपत्रे व सन्मानचिन्ह देऊन विजेत्यांचा गौरव करण्यात आला.
ही स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण करणारी, तांत्रिक कौशल्यांना चालना देणारी आणि फार्मसी शिक्षण अधिक व्यावहारिक बनविणारी ठरली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवृंद, आयोजक समिती, स्वयंसेवक व सहभागी विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रजी थिटे व सचिव धनंजय थिटे, प्रमुख पाहुणे, प्राचार्य व परीक्षकांनी सहभागी व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. एकूणच हा उपक्रम अत्यंत यशस्वी, प्रेरणादायी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यास दिशा देणारा ठरला.


