शिरूर, दि. १९ (उद्धव जाधव)
केंद्र सरकारची आयुष्मान भारत योजना तसेच महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम व इतर कामगार कल्याण मंडळाच्या आरोग्य उपचार योजनांचे कार्ड उपलब्ध असतानाही अपघातग्रस्त कुटुंबाला मोफत उपचार नाकारून हजारो रुपयांचे बिल आकारल्याचा गंभीर प्रकार शिरूर येथील रुबी हॉल संचलित माणिकचंद हॉस्पिटलमध्ये उघडकीस आला आहे. या मनमानी कारभाराविरोधात भारतीय बहुजन पालक संघाने आंदोलनाची तयारी दर्शविली असून रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथील रहिवासी सयाजी तबाजी आडगळे व सारिका सयाजी आडगळे या दांपत्याकडे आयुष्मान भारत योजना व कामगार कल्याण मंडळाचे वैध उपचार कार्ड असतानाही, “ही कार्डे आमच्या रुग्णालयात चालत नाहीत” असे कारण पुढे करत माणिकचंद हॉस्पिटल प्रशासनाने उपचारासाठी तब्बल ७० हजार रुपयांचे बिल आकारल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही बाब समजताच भारतीय बहुजन पालक संघाचे राज्य संयोजक नाथाभाऊ पाचर्णे यांच्यासह संघाच्या कार्यकर्त्यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेत प्रशासनाला जाब विचारला.
कार्यकर्त्यांनी केलेल्या चौकशीत रुग्णांना शासकीय आरोग्य योजनांचा लाभ न देणे, औषधांची चढ्या दराने विक्री करणे, तपासण्यांचे दर अवाजवी असणे अशा अनेक त्रुटी समोर आल्या. या प्रकारानंतर रुग्णालयाचे तत्कालीन प्रशासक मायकेल पॉल यांनी कार्यकर्त्यांची माफी मागून भविष्यात अशा चुका होणार नाहीत, अशी ग्वाही दिली. दरम्यान, या घटनेची तक्रार थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे करण्यात आली होती. त्याची गंभीर दखल घेत रुग्णालय प्रशासनाने प्रशासक मायकेल पॉल यांची हकालपट्टी करून त्यांच्या जागी डॉ. संजीव तांदळे यांची नियुक्ती केली आहे.
दरम्यान, भारतीय बहुजन पालक संघाच्या वतीने दि. १६ जानेवारी २०२६ रोजी नव्याने रुजू झालेले प्रशासक डॉ. संजीव तांदळे यांना सविस्तर निवेदन देण्यात आले. या निवेदनात माणिकचंद हॉस्पिटल हे धर्मादाय रुग्णालय असल्याने शासन निर्णयानुसार रुग्णालयाच्या बाहेर मोठ्या व ठळक अक्षरात “धर्मादाय रुग्णालय” असा फलक लावावा, आयुष्मान भारत योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत पात्र रुग्णांना नियमाप्रमाणे मोफत उपचार द्यावेत, गोरगरीब महिलांसाठी स्वतंत्र प्रसूतिगृह सुरू करून आवश्यक डॉक्टर व कर्मचारी नेमावेत, रुग्णालयाशी संलग्न मेडिकलमधील औषधांचे दर इतर मेडिकलप्रमाणेच ठेवावेत, तसेच रुग्णालयात होत असलेल्या विविध तपासण्यांचे अवाजवी दर कमी करावेत, अशा ठोस मागण्या करण्यात आल्या आहेत.
नाथाभाऊ पाचर्णे यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, “रुग्णालय प्रशासनाने केवळ आश्वासनांवर वेळ न घालवता प्रत्यक्षात सुधारणा कराव्यात. पुढील १५ दिवसांत मागण्यांची पूर्तता न झाल्यास सर्व समाजघटक व विविध संघटनांना एकत्र घेऊन संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.” या प्रकरणामुळे शिरूर शहरात खळबळ उडाली असून, या रुग्णालयांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

