पिंपरखेड | (प्रफुल्ल बोंबे) दि. ११
जिल्हा परिषद पुणे अंतर्गत शिक्षण विभाग, पुणे जिल्हा मुख्याध्यापक व विज्ञान संघ तसेच जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल, वाघोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५३ वे बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन वाघोली (पुणे) येथे उत्साहात पार पडले. या तीन दिवसीय विज्ञान प्रदर्शनात तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावलेल्या पिंपरखेड (ता. शिरूर) येथील श्रीदत्त विद्यालयाची इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी स्वराली नवनाथ दाभाडे हिने जिल्हास्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या यशामुळे तिची नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली असून परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.स्वराली दाभाडे हिने “उद्योन्मुख तंत्रज्ञान” या विषयांतर्गत वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाचा उपयोग या संकल्पनेवर आधारित नाविन्यपूर्ण वैज्ञानिक उपकरणाची निर्मिती केली होती. हे उपकरण तिने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रभावीपणे सादर करून परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
या प्रसंगी पुढील वाटचालीस शुभेच्छा देत डी.आर.डी.ओ.चे संशोधक डॉ. नागरकर, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते स्वरालीचा गौरव करण्यात आला.या वैज्ञानिक उपकरण निर्मितीसाठी स्वरालीला प्राध्यापक प्रियांका भोसले, रमेश गावशेते, प्रियांका येवले, नितीन कोकाटे, नारायण पाबळे, निसार शेख, सुप्रिया वरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल ग्रामविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खुशाल बोंबे, सरपंच राजेंद्र दाभाडे, उपसरपंच विकास वरे, सोसायटीचे अध्यक्ष किरण ढोमे, आबाजी पोखरकर, प्राचार्य रामदास मगर यांनी स्वरालीचे अभिनंदन करून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


