शिरूर तालुक्यात खळबळ ; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
शिरूर दि. १७ ( अरुणकुमार मोटे) | शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा सजातील ग्राम महसूल अधिकारी(तलाठी ) प्रमीला नागेश वानखेडे (वय ४४ )यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ७ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केल्याने शिरूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. शिरूर पोलीस स्टेशन येथे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
एका तक्रारदाराच्या वडीलोपार्जित जमिनीचा पंचनामा आपल्या बाजूने करून देण्यासाठी तसेच पुढील कामात मदत करण्याच्या बदल्यात आरोपी लोकसेविका प्रमीला वानखेडे यांनी सुरुवातीला १० हजारांची लाच मागितल्याचे तक्रारीत नमूद आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर दि. १६जानेवारी रोजी पडताळणी करण्यात आली. या दरम्यान पंचासमक्ष तडजोडीअंती ७ हजारांची लाच स्वीकारण्याचे आरोपीने कबूल केले आहे .
दि.१६ जानेवारी रोजी दुपारी सुमारे २ वाजून ६ मिनीटांनी न्हावरे–तळेगाव रोडवरील छत्रपती संभाजी चौक येथे पंचासमक्ष ७ हजारांची लाच स्वीकारताना आरोपी ग्राम महसूल अधिकारी प्रमीला वानखेडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. कारवाईनंतर आरोपीविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथील पोलीस उपअधिक्षक भारती मोरे करत आहे.शासकीय कामासाठी लाच मागितल्याच्या या कारवाईमुळे शिरुरच्या महसूल वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
महसुल विभागाचे काम अन् बारा महीने थांब..
शिरूर तालुक्यातील अनेक सजातील ग्राममहसुल अधिकारी (तलाठी ) नागरिकांना वारसाच्या, खरेदीच्या नोंदीसाठी, प्रकरणातील पंचनाम्यासाठी वेठीस धरत आहे.तसेच शिरूर तहसील कार्यालयातील कारभार सध्या नागरिकांच्या संयमाची अक्षरशः परीक्षा पाहणारा ठरत आहे. हक्क नोंद विभागात साधी-साधी कामेही सहा ते सात महिने रखडत असल्याने “सरकारी काम आणि वेळेचे गणितच पूर्णपणे कोलमडले आहे” अशी तीव्र नाराजी नागरिकांतून व्यक्त होत आहे. कलम १५५ अन्वये चूक दुरुस्तीची कामे या विभागात केली जात असली, तरी प्रत्यक्षात तेथील महिला कर्मचारी नागरिकांना केवळ ‘तारीख पे तारीख’ देत आहेत.
परिणामी नागरिकांना या विभागात रोज तहसील कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. एकाच कामासाठी वारंवार बोलावले जाते; मात्र प्रत्यक्ष निर्णय काही केल्या होत नाही. कार्यालयातील काही महीला मुजोर अधिकारी केवळ अर्जांवर ‘पुढील तारीख’ टाकण्यातच व्यस्त असल्याची संतप्त चर्चा नागरिकांत आहे.कामे रखडल्यामुळे शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, महिला व सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक आणि मानसिक हाल होत आहेत. “कार्यालयात गेलो की काम होईल,” ही अपेक्षाच संपल्याची भावना नागरिक उघडपणे व्यक्त करत आहेत.
दरम्यान, प्रशासनाने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष न दिल्यास नागरिकांच्या असंतोषाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिरूर तहसील कार्यालयातील हा भोंगळ कारभार नेमका कधी सुधारणार? असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे.
किरकोळ नाव दुरुस्तीसाठी गेल्या सात महिन्यांपासून तहसील कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत असल्याची कैफियत सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक अशोक सोनवणे (रा. निर्वी, ता. शिरूर) यांनी मांडली.“सेवानिवृत्तीनंतर मी मुलाकडे पुण्यात राहतो. प्रत्येक वेळी फक्त तारीख दिली जाते. मी ज्येष्ठ नागरिक असून तहसील कार्यालयाच्या पायऱ्या झिजवून झिजवून माझे पाय झिजले; पण माझे काम झाले नाही. वारंवारचा प्रवास, फेऱ्या यामुळे मी शारीरिक व मानसिकदृष्ट्या पूर्णपणे थकलो आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. एकूणच महसुल विभागाच्या या भ्रष्ट व दिरंगाई प्रकरणामुळे नागरिकांना विनाकारण वेठीस धरले जात आहे.


