शिरूर दि. १७ (अरुणकुमार मोटे ) : दोन दिवसांपूर्वी “शिरूर डिजिटल डॉट कॉम ने” ‘शिरुरच्या बाबुरावनगर परिसरात पायाभूत सुविधांचा ग्रामपंचायतीकडून बोजवारा’ या सदराखाली शिवसाई मंगल कार्यालयाजवळील ड्रेनेज तुंबल्याची बातमी केली होती. आठ दिवसापासून रखडलेल्या या समस्येचे निराकरण झाले. परंतु दुसरीकडे डेक्कन शाळेसमोरील रस्त्यावर असलेल्या चेंबरमधून दुर्गंधीयुक्त पाणी वाहत आहे. हा रस्ता सतत वर्दळीचा असून डेक्कन शाळेतील विद्यार्थी आणि पालक या रस्त्याने ये-जा करत असतात. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार गेल्या दोन महिन्यात तीन वेळेस हे ड्रेनेज तुंबले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाला कळवल्यानंतर दोन-चार दिवसाच्या पाठपुराव्यानंतर ड्रेनेजची काम करणे अपेक्षित होते. परंतु आठ दिवसांनी पुन्हा “जैसे थे” परिस्थिती आहे. हे रस्त्यावरील ड्रेनेज तुंबल्यामुळे परिसरातील इमारतींच्या ड्रेनेजची घाण पुढे जात नाही. यामुळे शेजारील इमारतीतील ड्रेनेज तुंबते. ईमारतीमधील ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणी बिल्डिंगमध्येच ड्रेनेज लाईनमधून वर पार्किंगमध्ये येत आहे. पार्किंगमध्ये वर आलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्याचा उग्रवास ईमारतीतील रहिवाशांच्या स्वयंपाक घरापर्यंत गेल्यामुळे रहिवाशांना उलट्या-मळमळ असे प्रकार होत आहेत. येथील रहिवाशांना नाक दाबून दिवस काढावे लागत आहेत. या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरात डास -माशा यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून यामुळे संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामपंचायत प्रशासनाने या वारंवार तुंबणाऱ्या गटारींची गांभीर्याने दखल घेऊन याच्यावर कायमस्वरूपीचा तोडगा काढावा अशी स्थानिक रहिवाशांची आग्रही मागणी आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन नागरिकांच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


