जांबुत : प्रफुल्ल बोंबे | दि. १६
महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीनंतर आता राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजू लागले आहे. पुणे जिल्ह्याचे विशेष लक्ष लागलेल्या शिरूर तालुक्यातील कवठे येमाई–टाकळी हाजी जिल्हा परिषद गटात अटीतटीच्या पंचरंगी लढतीचे संकेत स्पष्ट होत असून, इच्छुक उमेदवारांनी पक्षांतर्गत हालचाली वाढवत प्रचाराला सुरुवात केली आहे.
या गटात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), भाजप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तसेच अन्य घटकांमुळे लढत अधिकच रंगतदार झाली आहे. अनेक निवडणुकांमध्ये शांत भूमिका घेतलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला कवठे येमाई येथील एका उद्योजकाच्या पक्षप्रवेशामुळे बळकटी मिळाली असली, तरी जनतेचा कौल कुणाच्या पारड्यात पडणार, हे येणारा काळ ठरवणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून माजी आमदार पोपटराव गावडे यांचे सुपुत्र राजेंद्र गावडे यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. तब्बल साठ वर्षे या भागाचे नेतृत्व करणाऱ्या गावडे कुटुंबाची संघटनात्मक पकड अजूनही कायम असल्याचे मानले जाते. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनानंतर शरद पवार गटाकडून दामू घोडे यांनी जिल्हा परिषदेसाठी कंबर कसत जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.
भाजपकडून शिरूर तालुक्यात सर्वपक्षीय नेत्यांशी संबंध जपणारे सावित्रा थोरात यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतल्याने लढतीला नवे वळण मिळाले आहे. दरम्यान, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे समर्थक व माजी पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे यांची भूमिका अद्याप स्पष्ट नसली, तरी त्यांच्या निर्णयावर बेट भागातील राजकीय गणिते बदलू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
शिवसेना पक्षफुटीनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ताकद काहीशी कमी झाल्याचे चित्र असले, तरी बाळासाहेब डांगे यांच्या रूपाने या भागाला नवे नेतृत्व मिळाल्याने जुन्या शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. युवकांची मोठी फळी डांगेंच्या पाठीशी उभी राहत असल्याचे दिसून येत असून, याचा लाभ उबाठा गटाला होणार का, याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.
ही पंचरंगी लढत जिल्ह्याच्या राजकारणातील लक्षवेधक ठरणार असून, निवडणूक रिंगणात उतरलेले पाचही उमेदवार तुल्यबळ असल्याचे चित्र आहे. विकासकामांचा अनुभव आणि वारशाचा मुद्दा पुढे करत राजेंद्र गावडे यांनी मोठ्या मताधिक्याने विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. तर सर्वसामान्यांशी थेट संबंध, सामाजिक उपक्रम आणि वैयक्तिक मदतीच्या जोरावर दामू घोडे व डॉ. सुभाष पोकळे यांनीही विजयाचा दावा केला आहे.दरम्यान, उबाठा गटाचे उमेदवार बाळासाहेब डांगे यांनी केलेल्या समाजसेवेच्या आधारे न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त करत घराणेशाहीच्या राजकारणाला जनता कंटाळली असल्याचे मत मांडले आहे.
नवीन चेहऱ्याला संधी देण्यासाठी कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याने आपण विजयाचे मानकरी ठरू, असा दावा त्यांनी केला आहे.एकूणच, अनुभव, नेतृत्व आणि नव्या चेहऱ्यांच्या संघर्षामुळे कवठे येमाई–टाकळी हाजी गटातील ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.