कान्हूर मेसाई:ता. १४ (सुनिल जिते )
कान्हूर मेसाई (ता.शिरूर) येथील रहिवासी व लष्करातील जवान मनोज कुमार दळवी नुकतेच तीस वर्षांच्या प्रदीर्घ लष्करी सेवेनंतर निवृत्त झाले. त्यानिमित्ताने रविवारी(ता.११) सकाळी गावकऱ्यांनी त्यांची मिरवणूक काढली. मेसाई कार्यालयात झालेल्या भव्य सेवापूर्ती गौरव सोहळ्यात त्यांचा ग्रामस्थांनी कुटुंबियांसह सपत्नीक सत्कारही केला. यावेळी दळवी यांना गहिवरून आले होते.
राष्ट्राच्या संरक्षणासाठी आहोरात्र सीमेवर पाहारा देणाऱ्या प्रत्येक सैनिकाबाबत नागरिकांमध्ये कायमच आदराची भावना असते. त्याच्या निवृत्तीनंतरही हा भाव कायम असलेला पाहायला मिळतो. कान्हूर मेसाई येथे निवृत्त होऊन आलेल्या सुभेदार मनोज कुमार दळवी यांच्याबाबत असाच अभिमान बाळगत येथील नागरिकांनी व कुटूंबानी त्यांचा निवृत्ती सोहळा साजरा करून सैनिकांप्रती असलेला आदर व अभिमान व्यक्त केला.
तीस वर्षे लष्करी सेवा केल्यानंतर कान्हूर मेसाई येथील सुभेदार मनोज कुमार दळवी निवृत्त होऊन दि.०१ जानेवारी ला घरी परतले आहेत. त्यानंतर कुटूंबानी व ग्रामस्थांनी दळवी यांचा सेवापूर्ती व गौरव सोहळा मोठ्या दिमाखात मिरवणूक काढून केला.या कार्यक्रमास कान्हूर व पंचकृषितील आजी – माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, आजी – माजी सरपंच, उपसरपंच,तरुण, लहान मुले व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावच्या वतीने सेवापूर्ती सत्कार पाहून मी कृतघ्न झालो.३० वर्षे घर सोडून लष्करात काम करताना फक्त नोकरी म्हणून पाहिलं नाही, मातृभूमीची सेवा करताना जन्मदात्या आईचा व अर्धांगिनीचा त्यागही आठवत होता.तसे मातृभमीची सेवा करण्याचे समाधानही मिळाले. मात्र कुटुंबियांसह आई व पत्नीच्या पाठिंब्यामुळेच इतकी वर्षे मातृभूमीची प्रामाणिकपणे सेवा करू शकलो. आगामी काळात गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहू.
–सुभेदार मनोजकुमार दळवी


