शिरूर : (अरुणकुमार मोटे) | शिरूर तालुक्यात सध्या राजकारणाचा एक वेगळाच आणि चिंताजनक प्रवाह दिसून येत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी देवदर्शनाचे दौरे, हजारोंच्या जेवणावळी, भव्य सांस्कृतिक कार्यक्रम तसेच महागड्या खानावळींचा सपाटा सुरू असून, निवडणूक अद्याप जाहीरही न झाल्याने तालुक्यात आधीच रणधुमाळी सुरू झाल्याचे चित्र आहे.
विशेषतः रांजणगाव–कारेगाव जिल्हा परिषद गटात कोट्यवधी रुपयांची उधळण सुरू असून, येथे भावकीतच प्रतिष्ठेची लढाई रंगली आहे. दोन्ही बाजूंनी वारेमाप खर्च केला जात असून, या शक्तिप्रदर्शनाचा आनंद मतदार मात्र घेताना दिसत आहेत.
या सर्व कार्यक्रमांचा मूळ उद्देश सेवा, विचारधारा किंवा विकास नसून केवळ शक्ती प्रदर्शन आणि पैशांची ताकद दाखवण्याची स्पर्धा हाच असल्याचे स्पष्टपणे जाणवते. कोण किती मोठी गर्दी जमवतो, कोण किती भव्य कार्यक्रम आयोजित करतो आणि कोण किती कोटी रुपये खर्च करतो, यावरच राजकीय ताकद मोजली जात असल्याचे चित्र आहे.
या परिस्थितीत एक गंभीर प्रश्न उपस्थित होतो — निवडणूक ही सामान्य कार्यकर्त्यांसाठी आहे की केवळ पैशांच्या जोरावर पुढे येणाऱ्या धनाढ्य नेत्यांसाठी?
सर्वसामान्य, अभ्यासू, प्रामाणिक आणि सेवाभावी कार्यकर्त्यांना या स्पर्धेत उभे राहणे अशक्य होत चालले आहे. ज्याच्याकडे कोट्यवधी रुपये आहेत तोच उमेदवार ठरत असून, आर्थिक ताकद नसलेले कार्यकर्ते आधीच शर्यतीबाहेर फेकले जात आहेत.
ही परिस्थिती लोकशाहीसाठी अत्यंत घातक मानली जात आहे. लोकशाहीत मत हे विचारांवर आणि मूल्यांवर आधारित असायला हवे; श्रीमंतीवर नव्हे. मात्र सध्याचे चित्र नेमके याच्या उलट असल्याचे दिसून येत आहे.
यामुळे निवडणूक आयोगाची भूमिका अधिक महत्त्वाची ठरते. देवदर्शन दौरे, भव्य मेळावे आणि खर्चिक कार्यक्रम हे निवडणूक खर्चाच्या कक्षेत येतात का? या खर्चाची अधिकृत नोंद होते का? आणि त्यावर कोणती कारवाई होते? असे प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहेत.
वेळीच या पैशाच्या उधळपट्टीवर नियंत्रण आणले नाही, तर भविष्यात निवडणुका लोकशाहीचा उत्सव न राहता श्रीमंतांचा खेळ ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत सामान्य माणसाला उमेदवारी मिळण्याची शक्यताच संपुष्टात येईल.
म्हणूनच निवडणूक आयोगाने केवळ कागदोपत्री नियम न ठेवता प्रत्यक्षात कठोर अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा लोकशाहीची पायाभूत तत्त्वे हळूहळू पैशांच्या चिखलात गाडली जातील, आणि ही लोकशाहीसाठीची सर्वात मोठी शोकांतिका ठरेल.


