न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ‘पर्यावरणपूरक गणपती बनवा’ कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद; २५० विद्यार्थ्यांनी साकारल्या मूर्ती
पारनेर | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स तसेच राजमाता जिजाऊ इंग्लिश मीडियम स्कूल, पारनेर येथे ‘पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणपती बनवा’ ही कार्यशाळा उत्साहात पार पडली. या उपक्रमात इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या सुमारे २५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वतःच्या हातांनी आकर्षक गणेशमूर्ती साकारल्या.
कार्यशाळेत विद्यार्थ्यांना शाडू मातीचे पर्यावरणीय महत्त्व, गणेशमूर्ती घडविण्याची पद्धत, आकारनिर्मिती तसेच पर्यावरणपूरक सजावटीबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. मातीला विविध आकार देताना विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व कलागुणांना मुक्त वाव मिळाला. ‘माझा गणपती, पर्यावरणपूरक गणपती’ हा विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या गणेशमूर्ती तयार केल्या. विशेष म्हणजे, सध्या विविध ठिकाणी चर्चेत असलेल्या ‘बॅलन्सिंग गणेशमूर्ती’ तयार करण्याचाही काही विद्यार्थ्यांनी अभिनव प्रयोग केला. पारंपरिक मूर्तीनिर्मितीला आधुनिक कलात्मकतेची जोड मिळाल्याने हा उपक्रम अधिक आकर्षक ठरला.
इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी ईश्वरी बोरकर हिने सांगितले की, तयार केलेली गणेशमूर्ती नैसर्गिक रंगांनी सजवून घरी प्रतिष्ठापना करण्यात येणार असून, विसर्जन घरीच पाण्यात करून त्या मातीमध्ये फुलांचे रोप लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
महिला शिक्षिका रिमा भिंगारदिवे यांनीही विद्यार्थ्यांसोबत प्रत्यक्ष मातीमध्ये काम करत गणेशमूर्ती साकारली. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे केलेल्या कलानिर्मितीने कार्यशाळेचे वातावरण अधिक उत्साहपूर्ण बनले.
विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देतानाच कलात्मक दृष्टी, श्रमप्रतिष्ठा आणि पर्यावरणाप्रती जबाबदारीची भावना विकसित करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे प्राचार्य कचरू शिंदे यांनी सांगितले.कार्यशाळेस प्राचार्य कचरू शिंदे, उपप्राचार्य संतोष इंगळे, पर्यवेक्षक अजित दिवटे, राजमाता जिजाऊ इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका कविता गवते यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी विद्यार्थ्यांनी घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद ठरला असून, ‘भक्तीसोबत निसर्गाचीही आराधना करूया’ हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.


