पुणे दि. ९ ( अरुणकुमार मोटे):
लोणावळा येथे पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांना अंमली पदार्थ बाळगल्याचा बनाव करून कारवाईची भीती दाखवत तब्बल पाच लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या महामार्ग सुरक्षा पोलीस विभागाच्या खंडाळा पथकातील पोलीस कर्मचारी व त्यांच्या सहकाऱ्यांचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन पोलीस अंमलदार, दोन होमगार्ड आणि एका ट्रॅफिक वॉर्डनसह पाच जणांना अटक करण्यात आली असून आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचा सहभागही तपासात निष्पन्न झाला आहे. या घटनेमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.
कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १२७(२), १४०(३), ३०८(२), ३५१(२)(३), ३५२ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर (पुणे) येथील भूषित उमेश शर्मा (वय २८) हे ५ जुलै रोजी आपल्या मित्रांसह चारचाकी वाहनाने लोणावळा येथे पर्यटनासाठी जात होते. दुपारी साडेचारच्या सुमारास पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील ताजे (ता. मावळ) परिसरात अंबर दिवा लावलेल्या झायलो वाहनातून आलेल्या सहा जणांनी त्यांचे वाहन अडवले. आरोपींनी स्वतःला अधिकृत कारवाई करणारे असल्याचा आव आणत फिर्यादी व त्यांच्या मित्रांकडे अंमली पदार्थ असल्याचा संशय व्यक्त केला. त्यानंतर कारवाईची भीती दाखवत पाच लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. एवढेच नव्हे तर फिर्यादींना तळेगाव दाभाडे परिसरात नेऊन एटीएममधून पैसे काढण्यास भाग पाडण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
या घटनेनंतर फिर्यादीने कामशेत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. तपास पथकाने घटनास्थळाची पाहणी, साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. तपासात हा प्रकार महामार्ग सुरक्षा पोलीस विभागाच्या खंडाळा पथकातील कर्मचाऱ्यांनीच केल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणात अमोल महादेव ननावरे व तुषार बाळू डावरे (दोघेही पोलीस अंमलदार), तुषार संजय घाडगे व किसन कोंडीबा बोंबले (होमगार्ड) तसेच नितेश दीपक चव्हाण (ट्रॅफिक वॉर्डन) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच पोलीस अंमलदार अमोल अशोक वायकर याचाही सहभाग असल्याचे तपासात समोर आले असून त्याच्याबाबत पुढील कारवाई सुरू आहे.
अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींना न्यायालयात हजर केले असता १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या काळात अशाच प्रकारचे आणखी गुन्हे केले आहेत का, याचाही तपास करणे गरजेचे आहे.
दरम्यान, महामार्ग सुरक्षा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी पवार यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे संबंधित पोलीस अंमलदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
या घटनेमुळे पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारेच कर्मचारी खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यात सहभागी असल्याचे उघड झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, अशा प्रकारे पर्यटकांना लक्ष्य करणारे आणखी रॅकेट कार्यरत आहे का, याचाही तपास सुरू आहे.

