शिरूर, दि. २२ ( अरुणकुमार मोटे)
शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी शिरूर येथे काही दिवसांपूर्वी मोठे आंदोलन व उपोषण करण्यात आले होते. या आंदोलनात तत्कालीन अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांची बदली करून तालुक्याला धडाकेबाज व दबंग अधिकारी देण्याची मागणी करण्यात आली होती. आंदोलनाची दखल घेत पोलिस अधीक्षकांनी स्वतः आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन सकारात्मक आश्वासन दिले होते. मात्र, त्या आश्वासनाचे पुढे काय झाले, असा सवाल आता आंदोलनकर्ते आणि नागरिक उपस्थित करत आहेत.
आंदोलनानंतर पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी अवैध धंद्यांविरोधात धाडसत्र सुरू करून दारू, जुगार, मटका आणि इतर बेकायदेशीर व्यवसायांचे चांगलेच कंबरडे मोडले होते. त्यांच्या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक ठिकाणी अवैध व्यवसाय बंद पडल्याचे चित्र दिसत होते.
मात्र, केंजळे यांची बदली होताच पुन्हा एकदा अवैध धंदेवाल्यांनी डोके वर काढल्याची चर्चा तालुकाभर सुरू झाली आहे. शिरूर शहरात अल्पवयीन शाळकरी मुलींचा पाठलाग करून
लज्जा उत्पन्न होईल असे कृत घडत आहे. मॅफेड्रॉन ची खुलेआम विक्री होत आहे. तसेच शहरासह गावोगावी हातभट्टी, जुगार, मटका आणि इतर बेकायदेशीर व्यवसाय पुन्हा राजरोसपणे सुरू झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नवीन आलेले पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या काळात अवैध धंद्यांवर अपेक्षित प्रमाणात कठोर कारवाई होताना दिसत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
विशेष म्हणजे, आंदोलनकर्त्यांना भेटीसाठी बोलावण्याचे आणि पुढील कारवाईबाबत चर्चा करण्याचे आश्वासन पोलिस अधीक्षकांनी दिले होते. मात्र आजपर्यंत आंदोलनकर्त्यांना कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे “आश्वासन फक्त आंदोलन शांत करण्यासाठी होते का?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
शिरूर तालुक्यात पुन्हा वाढत असलेल्या अवैध धंद्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. अशातच माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शिरूर येथे आढावा बैठकीत बेट भागातील अवैध धंद्यावर कारवाई करण्यास सांगितले तरीही कारवाई होत नसल्याने आच्छर्य व्यक्त केले जात आहे.
पोलिस प्रशासनाने तातडीने याची गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई करावी, अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा नागरिक व आंदोलनकर्त्यांकडून दिला जात आहे.
“अवैध धंदे बंद झाले की काहींचे आर्थिक गणित बिघडते, म्हणूनच कारवाईचा वेग मंदावला का?” असा चर्चेचा विषय सध्या शिरूर तालुक्यात रंगू लागला असून पोलिस प्रशासन याबाबत काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.काही ठिकाणी पोलिस प्रशासनाच्या आशीवार्दाने शिरूर शहर व बेट भागात जुगार, मटका, हातभट्टी, ताडी, सुरु झाल्याची चर्चा नागरीकांमध्ये होत आहे.(क्रमशः )

