शिरूर दि. १८ ( अरुणकुमार मोटे)
“तुझ्या चुकीच्या सांगण्यामुळे मला कंपनीतून कामावरून काढण्यात आले,” असा जाब विचारत एका तरुणाला रस्त्यात अडवून पाच जणांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना शिरूर शहरातील वात्सल्य हॉस्पिटलसमोर घडली. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतिषकुमार जयप्रकाश सिंग (वय २६, रा. सुंदरसृष्टी, शिरूर, मूळ रा. बलिया, उत्तर प्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवारी (ता. १७) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ते घरी जात असताना शशिकांत गायकवाड (रा. शिक्रापूर) व त्याच्या चार अनोळखी साथीदारांनी त्यांना अडविले.
यावेळी “तुझ्यामुळे मला कंपनीतील नोकरी गमवावी लागली,” असा आरोप करत पाचही जणांनी संगनमताने फिर्यादीस शिवीगाळ केली. तसेच हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दहशत निर्माण केली. एवढ्यावरच न थांबता, “गर्दीपासून दूर नेऊन तुला धडा शिकवू,” अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये शशिकांत गायकवाड (रा. शिक्रापूर) व अनोळखी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसून पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप पुढील तपास करीत आहेत.
शिरूर शहरासह तालुक्यात खुण, हाणामारी, चोऱ्या,दुचाकी चोरीच्या घटना वारंवार घडत आहे. याला पायबंद घालण्यासाठी पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्याकडून दबंग कारवाईची अपेक्षा नागरीकांना आहे,. गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्यासाठी त्यांना आता कठोर पावले उचलावी लागणार आहेत. अन्यथा शिरुरचा बिहार होण्यास वेळ लागणार नाही.
पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी चार्ज घेतल्यानंतर काही गावगुंडांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आहे. अश्या आरोपींवर ही कारवाई करण्याची मागणी होत आहे.

