डांगे यांच्या पक्षांतराचा स्फोट; राष्ट्रवादीत खळबळ, वळसे गटात अस्वस्थता
शिरूर : (अरुणकुमार मोटे) | कवठे यमाई (ता. शिरूर) येथील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे निष्ठावान कार्यकर्ते तसेच बेट भागातील प्रभावी राजकीय नेतृत्व बाळासाहेब डांगे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने बेट भागातील राजकीय समिकरणे हादरून गेली आहेत.
या पक्षांतरामुळे बेट भागात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले असून, त्याचे पडसाद येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये उमटणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. डांगे हे केवळ कार्यकर्ते नसून, गेली अनेक वर्षे संघटन बांधणी, कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी करणे आणि निवडणुकांमध्ये निर्णायक भूमिका बजावणारे नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादीचा तळागाळातील संपर्क, संघटनात्मक नेटवर्क आणि विश्वास यावर मोठा घाव बसल्याचे चित्र आहे.
डांगे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर बेट भागात पुन्हा एकदा “मशाल पेटली आहे, आता घड्याळाला धग लागणार का?” असा सवाल चर्चेचा विषय ठरला आहे. राष्ट्रवादीच्या पारंपरिक बालेकिल्ल्यात शिवसेनेचा झेंडा फडकू लागल्याने घड्याळाच्या काट्यांची दिशा बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीतीलच काही स्थानिक नेत्यांचा डांगे यांना छुपा पाठिंबा असल्याचे संकेत मिळत असून, ही घटना केवळ एका व्यक्तीचे पक्षांतर न राहता संघटनात्मक उठावाची नांदी ठरू शकते, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
या घडामोडींमुळे बेट भागातील राष्ट्रवादीचे प्रमुख नेते दिलीप वळसे पाटील तसेच माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या गटात अस्वस्थता पसरली आहे. आतापर्यंत सुरक्षित मानला जाणारा हा भाग हातातून निसटतो की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.स्थानिक पातळीवर पक्षसंघटना कमकुवत झाल्याच्या तक्रारी, कार्यकर्त्यांमधील नाराजी आणि वरिष्ठांकडून होत असलेले दुर्लक्ष — या सगळ्यांचा स्फोट म्हणजेच डांगे यांचा पक्षांतराचा निर्णय असल्याची चर्चा आहे.
आगामी काळात शिवसेना बेट भागात आक्रमक मोडमध्ये जाण्याची चिन्हे असून, राष्ट्रवादीकडून नुकसान भरून काढण्यासाठी धावपळ सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणारी जिल्हा परिषद निवडणूक ‘हाय व्होल्टेज’ ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. मशालीची ज्वाळा अधिक भडकणार की विझणार, आणि घड्याळाची टिक-टिक थांबणार की वेग घेणार — हे येणारी निवडणूकच ठरवणार आहे.


